MLC Election 2024 ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या ११ जागांसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने मतांसाठी घोडाबाजार होणार, हे निश्चित आहे. अशातच काँग्रेसने बोलवलेल्या आमदारांच्या बैठकीला दोन आमदार गैरहजर राहिल्याने या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाने बोलावलेल्या बैठकीला काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी आणि जितेश अंतापूरकर यांनी दांडी मारली. त्यामुळे या आमदारांकडून क्रॉस वोटिंग होणार असल्याचं बोललं जात आहे.
काँग्रेसची केवळ दोन नव्हे तर एकूण आठ मते फुटणार असल्याची चर्चा रंगत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाच मते आणि भाजप उमेदवारांना तीन मते जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांनीच विजयी होऊ शकतात. असं झाल्यास काँग्रेसची मोठी नाचक्की होणार असून महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत होणार आहे.
कोणते उमेदवार निवडणूक रिंगणात?
भाजप : पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर
शिंदेसेना : भावना गवळी, कृपाल तुमाने
अजित पवार गट : राजेश विटेकर, शिवाजी गर्जे
काँग्रेस : प्रज्ञा सातव
उद्धवसेना : मिलिंद नार्वेकर
शेकाप : जयंत पाटील
मतांची समीकरणे कशी?
भाजपला आपले पाचही उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास असला तरी पहिल्या पसंतीची तीन मते त्यांना कमी पडतात.
शिंदेसेनेचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे ३९ आमदार असून त्यांना १० अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याने ते सुस्थितीत आहेत.
शेकापचे जयंत पाटील यांच्या स्वत:च्या पक्षाचे एकच आमदार आहेत. त्यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला असून त्यांचे १५ आमदार आहेत. याचा अर्थ जयंत पाटील यांच्याकडे १६ मते आहेत. त्यांना आणखी सात मतांची जुळवाजुळव करावी लागेल.
अजित पवार गटाचे ३९ आमदार आहेत. त्यांना आणखी सात मते लागतील. काही अपक्ष, लहान पक्ष आणि काँग्रेसमधील तीन मतांच्या भरवशावर त्यांचे गणित जुळेल, असे म्हटले जात आहे.