राज ठाकरेंना भेटायला का गेले देवेंद्र फडणवीस?; ३ शक्यतांनी धरला जोर, अमित ठाकरेंबाबत मोठी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 11:47 IST2025-02-10T11:24:40+5:302025-02-10T11:47:27+5:30

अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर संधी देऊन राज यांच्यासोबत राजकीय युतीसाठी हात पुढे करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे.

Big offer from devendra Fadnavis during Raj Thackerays meeting Talk of giving Amit Thackeray the promise of MLA post | राज ठाकरेंना भेटायला का गेले देवेंद्र फडणवीस?; ३ शक्यतांनी धरला जोर, अमित ठाकरेंबाबत मोठी चर्चा

राज ठाकरेंना भेटायला का गेले देवेंद्र फडणवीस?; ३ शक्यतांनी धरला जोर, अमित ठाकरेंबाबत मोठी चर्चा

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. विधानसभा निवडणूक निकालानंतर नुकतंच राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करत सत्ताधारी महायुतीचा समाचार घेतला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस हे राज यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या भेटीत फडणवीस यांनी राज ठाकरेंसोबत राजकीय घडामोडींबद्दल चर्चा करत काही प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. यामध्ये राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या राजकीय पुनर्वसनाचाही समावेश असल्याचे समजते.

दादर-माहीम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवलेल्या अमित ठाकरे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे राजकीय पदार्पणाच्या पहिल्याच लढाईत त्यांच्या पदरी निराशा पडली. हीच संधी हेरून आता भाजपकडून अमित ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदारकीची ऑफर देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.  राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी ६ जागांवरील नियुक्ती विधानसभा निवडणुकीआधी करण्यात आली होती. तर अजूनही उर्वरीत ६ जागा रिक्त आहेत. त्यामुळे अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर संधी देऊन राज यांच्यासोबत राजकीय युतीसाठी हात पुढे करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे.

महापालिका निवडणुकांवरही लक्ष

मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका यंदा होण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या शहरांच्या महापालिकांचाही समावेश आहे. या निवडणुकांमध्ये मनसे सोबत असेल तर महायुतीची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे विरोधात जाऊ नये म्हणून मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे स्वत: राज यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्याचं बोललं जात आहे. राज ठाकरे यांना मागील काही निवडणुकांत सातत्याने अपयश आलं असलं तरी आजही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. हीच बाब लक्षात घेत राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी भाजप आग्रही आहे.

नरेटिव्हची लढाई

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात नरेटिव्ह हा शब्द चांगलाच चर्चेत राहिला होता. इंडिया आघाडीने खोटं नरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल केली, असा आरोप महायुतीने केला. राज ठाकरे हे चांगले वक्ते म्हणून ओळखले जातात. ते आपली भूमिका स्पष्ट आणि ठामपणे लोकांसमोर मांडतात. त्यामुळे त्यांची भूमिका अनेकदा जनसामान्यांच्या मनाचा ठाव घेत असते. अशातच राज यांनी महायुतीविरोधात रान पेटवण्यास सुरुवात केली तर त्याचं होणारं संभाव्य नुकसान टाळण्यासाठीही महायुतीला राज ठाकरे आपल्यासोबत हवे असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि महायुतीविरोधात थेट भूमिका घेणारे राज ठाकरे पुन्हा महायुतीसोबत जातात की आपली 'एकला चलो रे'ची दिशा कायम ठेवतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, "राज ठाकरे यांच्यासोबत राजकीय चर्चा केली नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी माझं अभिनंदन केलं होतं. तेव्हाच मी एकदा घरी येईन, असं त्यांना सांगितलं होतं. त्यानुसार आज मी राज ठाकरे यांच्या घरी गेलो. ही मैत्रीपूर्ण भेट होती," असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीनंतर केला आहे.

Web Title: Big offer from devendra Fadnavis during Raj Thackerays meeting Talk of giving Amit Thackeray the promise of MLA post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.