ठाकरे गटाने गद्दार दिन साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ईडीने मुंबईत मोठे ऑपरेशन राबविले आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल ED Raids at Sanjeev Jaiswal यांच्यावरही एकापाठोपाठ एक छापे टाकण्यात आले आहेत. कोरोना काळातील भ्रष्टाचार प्रकरणी ही छापेमारी सुरु झाल्याचे समजते आहे.
सकाळी सुरुवातीला संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर Sujit Patkar यांच्या घरी छापेमारी करण्यात आली होती. पाटकर यांच्याशी संबंधीत १० ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. तसेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीयांवरही छापेमारी सुरु आहे. याचबरोबर कोरोना काळात मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडेही छापा टाकण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे सचिव सुरज चव्हाण यांच्या निवासस्थानी देखील ईडीने छापा टाकला आहे. मुंबईत जवळपास १५ ठिकाणी एकाचवेळी छापेमारी सुरु आहे.
लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस ही कंपनी सुजीत पाटकर यांची आहे. त्यात डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, संजय मदनराज शहा, राजू नंदकुमार साळुंखे हे भागीदार आहेत. त्यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी नगर पुणे जम्बो कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट हे फसवणूक करून मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.