Join us

मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 8:22 PM

प्रवाशांना पर्यायी वाहतूक व्यवस्था खुली व्हावी, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Mumbai Local ( Marathi News ) : मध्य रेल्वेवर घेण्यात येत असलेल्या तीन दिवसीय जम्बो ब्लॉकमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या ब्लॉकदरम्यान तब्बल ९३० लोकल फेऱ्यांसह ७२ मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना पर्यायी वाहतूक व्यवस्था खुली व्हावी, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून (PSV) प्रवाशांच्या वाहतूकीस सदर जम्बो ब्लॉक संपेपर्यंतच्या कालावधीत टप्पा वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येत आहे, असं सरकारने जारी केलेल्या निर्णयात म्हटलं आहे. त्यामुळे आता खासगी बसेसला प्रवासी वाहने म्हणून चालवणं शक्य होणार आहे.

"सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रस्तावित जम्बो ब्लॉकच्या कालावधीत प्रवासी वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी विनिर्दिष्ट करणे आवश्यक आहे, असं शासनाला वाटतं. त्यादृष्टीने आता मोटार वाहन अधिनियम १९८८ (१९८८ च्या ५९) चे कलम ६६ चे उपकलम (३) च्या खंड (एन) अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करुन हा निर्णय घेतला आहे," असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच सदर जम्बो ब्लॉक संपल्यानंतर सदर अधिसूचना रद्द समजण्यात यावी, असंही शासनाच्या निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, प्रवाशांच्या सोईसाठी हा निर्णय घेतल्याबद्दल मध्य रेल्वेकडून राज्य सरकारचे आभार मानण्यात आले आहेत.

मध्य रेल्वेवर कसा असेल मेगा ब्लॉक?

मध्य रेल्वेवर आजपासून तीन दिवस महामेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. मध्य रेल्वेवर आज दिवसभरात एकूण १६१ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेकडून आधीच या ब्लॉकची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी रस्ते मार्गाचाही अवलंब केल्याचं पाहायला मिळालं. यामुळे पूर्व द्रूतगती महामार्गावरही वाहतूक कोंडी झाली आहे. त्यात शहरातील तापमानाचा वाढलेल्या पाऱ्यानं घामाच्या धारांनी चाकरमानी वैतागले. अशी तिहेरी कोंडी मुंबईकरांची झाली. 

दरम्यान, मेगाब्लॉक कालावधीमध्ये ९३० लोकल फेऱ्यांसह ७२ मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ठाणे स्थानकात स्थानकात ६२ तासांच्या मेगाब्लॉकला मध्यरात्रीपासूनच सुरूवात झालीय. मुंबईहून कल्याणकडे जाणाऱ्या फास्ट मार्गावर ६२ तासांचा तर मुंबईकडे जाणाऱ्या स्लो मार्गावर १२ तासांचा हा मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वेवर यामुळे वेळापत्रक कोलमडलं आहे. 

टॅग्स :मुंबई लोकलराज्य सरकारमुंबई