भाजपा नेते मोहित कंबोज यांना मोठा दिलासा; मुंबई पोलिसांकडून मिळाली क्लीन चीट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 10:55 AM2022-12-23T10:55:25+5:302022-12-23T10:56:04+5:30
बँकेचे कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केला होता
मुंबई - भाजपा नेते मोहित कंबोज यांना गुन्हे आर्थिक शाखेकडून क्लीन चीट मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या कार्यकाळात कंबोज यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. मविआ सरकारच्या काळात कंबोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. परंतु आता या प्रकरणी पोलिसांनी कंबोज यांना क्लीन चीट दिली आहे.
कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय पांडे यांच्याविरोधात आर्थिक घोटाळे बाहेर आले होते. त्यानंतर संजय पांडे यांनाच अटक झाली. कथित बँक घोटाळा प्रकरणात कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता क्लीन चीट मिळाल्यानं कंबोज यांची आर्म्स ॲक्ट अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमधूनही सुटका होणार आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
बँकेचे कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मोहित कंबोज यांच्यासह त्यांच्या कंपनीतील दोन संचालकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. माहितीनुसार, मोहित कंबोज यांच्या कंपनीने २०११ ते २०१५ या कालावधीत इंडियन ओव्हरसीज बँकेकडून ५२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या बँकेची त्यांनी फसवणूक केली असून त्यांच्यावर कर्ज न फेडल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्जाची रक्कम ज्यासाठी घेतली होती त्यासाठी वापरली नसल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला.
कंबोज यांनी दिला होता इशारा
गुन्हा दाखल झाल्यानंतर कंबोज यांनी "मला अपमानाचे भय वाटत नाही. तसेच मला इतरांनी सन्मान द्यावा असा आग्रहीदेखील मी कधीच कुणाकडे धरत नाही. पण ज्यांनी कोणी माझ्याविरोधात षडयंत्र रचलं आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की १ जून ही तारीख तुमची होती, ३० जून तारीख माझी असेल. मी १ जुलै येऊ देणार नाही. महादेवाची शपथ घेऊन सांगतो, एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यांनी माझ्याविरोधात हे कारस्थान रचलं आहे, त्यांना मी ३० दिवसांच्या आतच उत्तर देईन", असा इशारा दिला होता.