मुंबईतील गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी; गणेशोत्सव काळातील ‘मेगा ब्लॉक’चं विघ्न दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 02:40 PM2023-09-16T14:40:51+5:302023-09-16T14:41:09+5:30
Ganeshotsav 2023 Mega Block News: गणेशोत्सवादरम्यान मुंबई रेल्वेत कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
Ganeshotsav 2023 Mega Block News: अवघ्या काही दिवसांनी गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी चाकरमानी सज्ज होत आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. यातच मुंबईतील गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सव कालावधीत मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे.
मुंबईत हजारो घरांत तसेच मंडळांत गणेशाची स्थापना केली जाते. तसेच गणपतीसाठी एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. काही मंडळे उत्तम प्रकारचे देखावे सादर करतात, ते पाहण्यासाठी मुंबईकर आवर्जुन भेटी देत असतात. यात मुंबईची लाइफलाइन मानली गेलेली लोकल महत्त्वाची भूमिका बजावत असते. मात्र, मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होत असते. गणेशोत्सवापुरते मेगाब्लॉकचे विघ्न दूर झाल्याचे सांगितले जात आहे. गणेशोत्सव काळात मेगाब्लॉक घेतला जाणार नाही.
गणेशोत्सव काळातील ‘मेगा ब्लॉक’चे विघ्न दूर
राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एक्सवर एक ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान मुंबईत रेल्वेने प्रवास करणाऱ्या भाविकांना रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे प्रवासात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून तो गणेश विसर्जनापर्यंत रद्द करण्याच्या संदर्भात मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर नरेश ललवानी जी यांच्याशी बोलणे झाले. गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही केलेली विनंती त्यांनी मान्य केली असून, गणेशोत्सवादरम्यान मुंबई रेल्वेत कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे, अशी पोस्ट मंगलप्रभात लोढा यांनी शेअर केली आहे.
दरम्यान, मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर टोलमाफी लागू करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. पोलिस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या सूचना आहेत.