बाप्पा पावला, तोडगा निघाला! CM एकनाथ शिंदेंसोबतची बैठक यशस्वी; ST कर्मचाऱ्यांचा संप मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 09:17 PM2024-09-04T21:17:45+5:302024-09-04T21:19:33+5:30
ST Employee Take Back Strike After Meeting With CM Eknath Shinde: ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पुकारलेला संप एसटी कर्मचाऱ्यांनी मागे घेतल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ST Employee Take Back Strike After Meeting With CM Eknath Shinde:एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृती समितीची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीतील चर्चेनंतर अखेरीस संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. राज्यभरात आला अनेक ठिकाणी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मात्र प्रवाशांचे अतोनात हाल झाले. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे गणपतीत गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांचे काय होणार, त्यांनी केलेल्या आगाऊ आरक्षणाचे काय होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले होते. मंत्री उदय सामंत यांनी एसटी कर्मचारी कृती समितीची एक बैठक घेऊन चर्चाही केली होती. परंतु, ती बैठक निष्फळ ठरली आणि आंदोलक संपावर ठाम राहिले. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत तोडगा निघाल्याने संप मागे घेण्यात आला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडे सहा हजारांची वाढ
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे शिष्टमंडळ, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघच्या जयश्री पाटील आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडे सहा हजारांची वाढ केली आहे.
आमची मागणी सरकारने मान्य केली
भाजपा नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना बैठकीत नेमके काय झाले, याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मनापासून आभार मानतो. आमची मागणी होती की, राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांच्या वेतननुसार महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे. किमान त्यांच्या श्रेणीत घेऊन जायला पाहिजे. सरकाने त्यासाठी समिती नेमली होती, त्या समितीने साडेपाच हजारांची मागणी सरसकट करावी, अशी सूचना केली होती. आमची मागणी पाच हजार रुपये वेतन वाढवण्याची मागणी केली होती. सरकारने आमची मागणी मान्य केली. ज्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये अडीच हजार, चार हजार आणि पाच हजार अशी सरसकट वाढ केली होती. त्या कर्मचाऱ्यांना सरसकट साडेसहा हजार रुपयांची वेतनात वाढ केली आहे, अशी माहिती पडळकर यांनी दिली.
उद्यापासून कामावर रुजू होण्याचे आवाहन
ज्यांना ५ हजार रुपयांची वाढ २०२१ मध्ये झाली होती, त्यांच्या पगारात आता दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. तसेच २०२१ ला ज्यांना चार हजार रुपयांची वाढ दिली होती, त्यांच्या पगारात अडीच हजारांची वाढ झाली. ज्यांना अडीच हजारांची वाढ दिली होती त्यांच्या पगारात ४ हजार रुपयांची भरघोस वाढ सरकारने केली आहे. यानिमित्त राज्य सरकारचा महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर रुजू व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, आज दिवसभरात ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील एसटीच्या २५१ पैकी ९४ आगार पूर्णतः बंद होते. ९२ आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. तर ६५ आगारामध्ये पूर्णतः वाहतूक सुरळीत सुरू होती. ४० हजार ०६९ नियोजित फेऱ्यांपैकी आंदोलनामुळे २७ हजार ४७० फेऱ्या रद्द झाल्या. दिवसभर सुमारे ७० टक्के वाहतूक बंद होती. यामुळे सुमारे २२ कोटी रुपयांचा महसूल बुडाला, अशी माहिती देण्यात आली.