Join us

अशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 6:46 PM

पहिल्या ‘लोकदरबार’मध्ये एकूण ९० निवेदने प्राप्त झाली असून, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

मुंबई : मंत्रालयातील प्रचंड गर्दीमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सुरू केलेल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी शेकडो नागरिक व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन आपली निवेदने सादर केली.

प्रारंभी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी अशोक चव्हाण यांचे स्वागत केले. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे, प्रा. प्रकाश सोनवणे, गजानन देसाई आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी सर्व अभ्यागतांच्या भेटी घेऊन निवेदने स्वीकारली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पहिल्या ‘लोकदरबार’मध्ये एकूण ९० निवेदने प्राप्त झाली असून, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

मंगळवारी आणि बुधवारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक मंत्रालयात येतात. मात्र, मंत्रालय प्रवेशासाठी मोठी गर्दी होत असल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागते. त्यातही एखादी शासकीय बैठक लागल्यास मंत्र्यांना त्यासाठी जावे लागते व लोकांचा अधिक वेळ खर्ची पडतो. ही अडचण दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दर बुधवारी दुपारी ३ वाजता प्रदेश काँग्रेसचे कार्यालय गांधी भवन, रिगल सर्कलजवळ, मॅजेस्टिक आमदार निवासच्या मागे, कुलाबा, मुंबई येथे उपस्थित राहून नागरिकांना भेटण्याचा निर्णय घेतला आहे. 

या माध्यमातून लोकांना निवेदने देण्यासाठी निश्चित जागा व वेळ उपलब्ध झाली असून, त्यांचा वेळ आणि श्रमही वाचणार आहेत. हा उपक्रम लोकांच्या सुविधेसाठी असल्याने याला ‘लोकदरबार’ असे नाव दिल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :अशोक चव्हाणकाँग्रेस