संपाला मोठा प्रतिसाद
By admin | Published: April 5, 2016 01:58 AM2016-04-05T01:58:23+5:302016-04-05T01:58:23+5:30
किरकोळ व्यवसायातून माथाडी कायदा व बाजार समितीचे नियमन वगळण्याच्या शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ रविवारी मध्यरात्रीपासून माथाडी कामगारांनी संप पुकारला होता
नवी मुंबई : किरकोळ व्यवसायातून माथाडी कायदा व बाजार समितीचे नियमन वगळण्याच्या शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ रविवारी मध्यरात्रीपासून माथाडी कामगारांनी संप पुकारला होता. या संपाला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळाला असून माथाडी कामगार व अन्य घटकांवर अन्याय करणाऱ्या शासनाच्या निर्णयाचा तीव्र विरोध केला. मंगळवार, १२ एप्रिल रोजी माथाडी कामगारांच्या या समस्यांवर विधान भवनात बैठक होणार असून प्रश्न सुटणार असल्याची माहिती राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते आ. नरेंद्र पाटील यांनी दिली.
आमदार नरेंद्र पाटील, युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान भवनात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शासन निर्णयामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करून माथाडी कामगार व अन्य घटकांवर कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षता शासनाकडून घेतली जाईल आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी बैठकीत दिले.
शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ संघटनेला तसेच कामगारांना अस्तित्वाची लढाई करावी लागत असल्याने हा लाक्षणिक बंद पुकारण्यात आला होता. संपात नवी मुंबईतील भाजीपाला आणि फळे, कांदा बटाटा मार्केट, अन्नधान्य मार्केट, कळंबोली स्टील मार्केट, वेस्टर्न विभाग, चेंबूर, एचपीसीएल, बीपीसीएल, बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, पिंपरी-चिंचवड, सातारा, कराड, कल्याण, नाशिक, कोल्हापूर, लातूर, पूणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हजारो माथाडी कामगार आणि अन्य घटक यात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
> भाजी मार्केटमध्ये कामगार आक्रमकमाथाडी कामगारांचा संप असला तरी भाजी मार्केटचे व्यवहार सुरूच ठेवले जातात. परंतु यावेळी शासनाने भाजीपालाच एपीएमसीमधून वगळण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे हे मार्केटही बंद ठेवण्याचा निर्णय कामगारांनी घेतला होता. रात्री एक वाजेनंतर येथे भाजीपाल्याची आवक सुरू होते. जवळपास १ हजार कामगारांनी मार्केटमध्ये येऊन व्यवहार थांबविण्याचे आवाहन केले. रोज ५०० ते ६०० वाहनांमधून भाजीपाल्याची आवक होत असते. परंतु संपामुळे फक्त १३० वाहनांची आवक झाली होती. आंदोलनामुळे माल मार्केटबाहेर गेला नाही. दिवसभरामध्ये ६० वाहनांचीच जावक झाली. कामगार मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्यामुळे येथील व्यवहारही थांबविण्यात आले. यामुळे शिल्लक राहिलेल्या भाजीचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
> कष्टाची कामे करणाऱ्या घटकाला न्याय देणारा माथाडी कायदा हा आशिया खंडातील एकमेव कायदा आहे. शासन हा कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे. माथाडी कामगारांच्या समस्या सोडविण्याकरिता शासन उदासीन असल्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ येईल.
- संतोष आहिरे,
कार्यकर्ता, माथाडी युनियन