मुंबई : वीजबील भरण्यासाठी छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्विकारणाऱ्या ग्राहकांना प्रती वीजबील १० रुपये सवलत महावितरणने १ डिसेंबर २०१८ ला जाहीर केली होती. मागील एका महिन्यात राज्यातील सुमारे २१ हजार ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. अन्य ग्राहकांनीही या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
वीजबील ऑनलाईन पाहण्यासाठी महावितरणने ग्राहकांना मोबाईल ॲप व www.mahadiscom.in या संकेतस्थळावर विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबीलही उपलब्ध करून देण्यात येते. परंतू जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे वीजबील उपलब्ध करून दिले जाते. अशा सर्व ग्राहकांना १ डिसेंबर २०१८ पासून प्रतीबील १० रुपये सवलत दिली जात आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अथवा महावितरणच्या संकेतस्थळावर https://billing.mahadiscom.in/gogreen.php येथे जाऊन करावी, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे.
गो-ग्रीनचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना तातडीने वीजबील मिळणार असून संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही त्यांना सोपे ठरणार आहे. गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरण संवर्धनालाही हातभार लावणारा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागद विरहीत गो-ग्रीन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी केले आहे.