लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाविकास आघाडीच्या जागावाटपात उद्धवसेनेच्या मुंबईतील आठही आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. गुरुवारी मातोश्रीवर झालेल्या आमदारांच्या बैठकीला शिवडीचे अजय चौधरी आणि चेंबूरचे प्रकाश फातर्पेकर याना निमंत्रण नव्हते. त्यामुळे त्यांचे तिकीट कापले जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, या दोन्ही आमदारांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती खास सूत्रांनी लोकमतला दिली.
शिवसेनेपासून शिंदे गट वेगळा झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांच्याकडे विधानसभा विधिमंडळाच्या गटनेतेपदाची जबाबदारी सोपविली होती. अजय चौधरी यांच्याच नेतृत्वाखाली विधिमंडळातील न्यायलढा लढण्यात आला होता, याकडेही या सूत्रांनी लक्ष वेधले. लालबागचा राजा मंडळाचे सुधीर साळवी हे शिवडीमधून लढण्यास इच्छुक होते. मात्र, साळवी यांना पक्षात विभागप्रमुखपद देण्यात येईल. तर, विद्यमान विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांना महापालिकेत मोठी संधी मिळेल, असेही या सूत्रांनी सांगितले.
मुखपत्रातून उमेदवारी जाहीर उद्धवसेनेच्या उमेदवारांची यादी पक्षाच्या मुखपत्रामधून जाहीर करण्यात येणार आहे. मुंबईसह राज्यातील अन्य उमेदवारांची जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
ठोस कारण नाही...
- चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांची मुलगी माजी नगरसेविका सुप्रदा फातर्पेकर यांच्याकडे उद्धवसेनेच्या सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.- प्रकाश फातर्पेकर यांना पुन्हा उमेदवारी न देण्यामागे कोणतेही ठोस कारण दिसत नाही. त्यामुळे त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल, असा दावाही सूत्रांनी केला.