Join us

महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 6:05 PM

लोकसभा निवडणूक निकालापासून काँग्रेस पक्षाकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येत आहेत.

Congress Prithviraj Chavan ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून काल पक्षाच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक राजधानी मुंबईत पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीसाठीची रणनीती आणि महाविकास आघाडीचे जागावाटपावर प्राथमिक चर्चा करण्यात आली. तसंच पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली आहे.

नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, "महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकजुटीने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनीही हीच भूमिका मांडली आहे. काल झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली तसंच, राज्यातील इतरही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष असतील. त्यांच्या नेतृत्वात समाजातील विविध घटकांशी चर्चा करूनच लोकाभिमुख असा जाहीरनामा जनतेसमोर सादर केला जाईल," असं पटोले यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूक निकालापासून काँग्रेस पक्षाकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येत आहेत. मध्य प्रदेशमधील लोकसभा निवडणूक निकालाचे विश्लेषण करण्याची जबाबदारी पक्षाने यापूर्वी चव्हाण यांच्या खांद्यावर टाकली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्याचं कामही त्यांच्याकडे देण्यात आलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असून पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री तसेच त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाकडून सहा राज्यांत प्रभारीपदाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली आहे. यासह केंद्रात काँग्रेस आघाडी सरकार असताना मित्रपक्षांसोबत समन्वयक म्हणूनही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. 

मविआने फुंकलं विधानसभेचं रणशिंग

लोकसभा निवडणुकीतील यशाने आत्मविश्वास दुणावलेल्या महाविकास आघाडीने १६ ऑगस्टला मुंबईत राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या महामेळाव्याचे आयोजन केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची दिशा व अन्य महत्वाच्या गोष्टींबाबत मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

टॅग्स :पृथ्वीराज चव्हाणकाँग्रेसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४