मुंबई - शिवसेनेनी सर्वात मोठी ताकद असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक यंदा रंगतदार होणार आहे. शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना यंदाच्या महापालिका निवडणुकीत दिसणार आहे. त्यामुळेच, शिवसेनेकडून मुंबईत ताकद वाढविण्यासाठी पाऊले उचलण्यात येत आहेत. आपल्या हटकेस्टाईलने सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या नितीन नांदगांवकर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठी जबाबदारी दिली आहे. नितीन नांदगावकर यांची उपनेतेपदी नियुक्ती केली आहे.
नितीन नांदगावकर (Nitin Nandgaonkar) यांनी नुकतीच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडे शिवसेनेच्या उपनेतेपदाची सूत्रे सोपवण्यात आली. त्यामुळे, आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने नितीन नांदगांवकर यांना शिवसेनेनं नेतेपदाची सुत्र सोपवली आहेत. गरिबांच्या प्रश्नांना खळ-खट्याकने सोडविण्याची त्यांची स्टाईल मनसेत असताना सर्वपरिचित झाली. आपले काम फेसबुकच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात ते पोहोचले आहेत. तर, मुंबईतही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्याच्या आंदोलनावेळीही त्यांनी रस्त्यावर उतरुन थेट राणा दाम्पत्यास इशारा दिला होता.
नितीन नांदगावकर यांनी २०१९ मध्ये मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षातून त्या पक्षात आल्यानंतरही त्यांनी त्याच्या स्टाईलने त्याचं काम पुढे नेलं. गरिबांच्या नोकरीसाठी एखाद्या उद्योजकाला भिडणं असो किंवा मुजोर टॅक्सीवाल्याचा समाचार घेणं असो, कोरोना कालावधीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये जाऊन त्यांनी काही रुग्णांची बिले कमी केली होती. त्यामुळे, त्यांच्या कामाची दखल सर्वत्र घेतली जाते. आता, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे, ही जबाबदारी पेलताना ते पक्षासाठी कसं काम करतात हे येणारा काळच सांगू शकेल.