Join us

शिवकालीन व्यक्तिरेखा गाजवणार मोठा पडदा; काही प्रदर्शनाच्या वाटेवर, तर काही निर्मितीप्रक्रियेत

By संजय घावरे | Published: January 27, 2024 8:27 PM

मागील काही वर्षांपासून मराठी सिनेसृष्टी ऐतिहासिक चित्रपटांच्या प्रेमात पडली आहे.

मुंबई: मागील काही वर्षांपासून मराठी सिनेसृष्टी ऐतिहासिक चित्रपटांच्या प्रेमात पडली आहे. सध्या आठ चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असून, निर्मिती सुरू असलेले सिनेमे यंदा उत्तरार्धात किंवा पुढल्या वर्षी प्रदर्शित होतील. शिवकालीन व्यक्तिरेखा या वर्षी मोठा पडदा गाजवणार आहेत. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने शिवराज अष्टकअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांवर सिनेमे बनवल्याने इतर फिल्ममेकर्सही शिवकालीन इतिहासाची वाट चालू लागले आहेत. यंदा शिवरायांखेरीज इतरही शिवकालीन व्यक्तिमत्त्वे रुपेरी पडद्यावर चमकणार आहेत. 'हिरकणी' बनलेली सोनाली कुलकर्णी 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'मध्ये ताराराणींच्या भूमिकेत दिसेल. याचे दिग्दर्शन राहुल जाधवने केले आहे. 

याखेरीज राहुलने 'बहिर्जी' चित्रपटाचेही शिवधनुष्य उचलले आहे. हा चित्रपट शिवाजी महाराजांचे विश्वासू शिलेदार बहिर्जी नाईकांच्या जीवनावर आधारित आहे. अजय-अनिरुद्ध दिग्दर्शित 'वीर मुरारबाजी... पुरंदरची युद्धगाथा' हा चित्रपट मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा सांगेल. यात अंकित मोहन मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय नाशिक नजीकच्या 'रामशेज' किल्ल्याच्या लढाईवरील 'रामशेज' चित्रपटातही अंकित आहे. शिवराज अष्टकाखेरीज दिग्पाल लांजेकर 'शिवरायांचा छावा'मध्ये धर्मरक्षक संभाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहे. 

महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'वीर दौडले सात' प्रदर्शनाच्या तयारीत आहे. विजय राणे दिग्दर्शित 'सिंहासनाधिश्वर'मध्ये शिवकालीन इतिहासातील वेगळा अध्याय पाहायला मिळेल. राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित-दिग्दर्शित 'छत्रपती संभाजी' हा मराठी चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, इंग्रजीमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होईल. दिग्दर्शक मिथिलेश सूर्यवंशी यांनी मागच्या महाशिवरात्रीला मुहूर्त केलेल्या 'सतराशे एक पन्हाळा'चीही प्रतीक्षा आहे. यंदा यांची शक्यता कमी...दिग्पालच्या 'शिवराज अष्टक'मधील आगामी सिनेमाची उत्सुकता आहे. डॉ. अमोल कोल्हेंच्या 'शिवप्रताप'मधील 'शिवप्रताप वाघनखं' आणि 'शिवप्रताप वचपा' हे चित्रपट बाकी आहेत, पण अद्याप यांच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा यापैकी एक तरी चित्रपट येईल की नाही याबाबत शंका आहे. नागराज-रितेश आणि रवीचा सिनेमा'बाल शिवाजी' या शीर्षकाचे दोन सिनेमे येणार आहेत. एकाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार आहे, तर नागराज मंजुळेंच्या साथीने रितेश देशमुख दुसरा चित्रपट बनवणार आहे. याखेरीज नागराज-रितेश या जोडीने 'राजा शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी' या दोन चित्रपटांची योजनाही आखली आहे. 'जिजाऊ' व 'भद्रकाली'चीही प्रतीक्षाराजमाता जिजाऊंच्या जयंतीला तेजस्विनी पंडीतच्या 'जिजाऊ'चा लूक रिव्हील करण्यात आला होता. याचे लेखन, दिग्दर्शन अनुजा देशपांडे करत आहेत. कोरोनापूर्वी पोस्टर लाँच झालेल्या दिग्दर्शक प्रितम पाटील यांच्या 'जिऊ - स्वराज्य कनिका'चीही प्रतीक्षा आहे. १८ व्या शतकातील छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडातील मराठा साम्राज्यातील एकमेव महिला सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे 'भद्रकाली' ची निर्मिती पुनीत बालन, लेखन दिग्पाल लांजेकर व दिग्दर्शन प्रसाद ओक करत आहे.

टॅग्स :मुंबईछत्रपती शिवाजी महाराज