चेंबूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका
By Admin | Published: November 14, 2016 04:47 AM2016-11-14T04:47:06+5:302016-11-14T04:47:06+5:30
महानगरपालिका निवडणुकीला अजून तब्बल दोन महिने अवकाश आहे. तथापि, आत्तापासूनच राजकीय वातावरण तापू लागले आहे.
मुंबई : महानगरपालिका निवडणुकीला अजून तब्बल दोन महिने अवकाश आहे. तथापि, आत्तापासूनच राजकीय वातावरण तापू लागले आहे. चेंबूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई संघटक सुभाष मराठे आणि चेंबूर तालुकाध्यक्ष आशा मराठे यांनी रविवारी दोन हजार कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
गेल्या अनेक वर्षांपासून सुभाष मराठे आणि त्यांच्या पत्नी आशा मराठे या राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होते. दोघांच्या प्रयत्नाने चेंबूरमध्ये अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे अस्तित्व निर्माण झाले होते. सावित्रीबाई फुले घरेलू माहिला कामगार संघटनेच्या माध्यमातून आशा मराठे यांनी अनेक महिलांना आधार दिला आहे. या महिलांच्या समस्यादेखील त्यांनी मार्गी लावल्या आहेत. राष्ट्रवादीकडून याबाबत काहीच दखल घेतली जात नसल्याने नाराज झालेले मराठे दाम्पत्य रविवारी भाजपामध्ये दाखल झाले. या वेळी त्यांचे सुमारे दोन हजार कार्यकर्ते आणि घरेलू कामगार महिलांनीदेखील भाजपात प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसल्याची चर्चा चेंबूरमध्ये रंगली होती.
आगामी पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आशा मराठे यांची निवड निश्चित झालेली होती. याची फक्त पक्षातर्फे औपचारिक घोषणा होणे शिल्लक होते. विशेष म्हणजे भाजपाप्रवेशावेळी काँग्रेस, मनसे, शिवसेनेच्या देखील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या वेळी भाजपाचे प्रदेश संघटनमंत्री सुनील कर्जतकर, प्रवक्ते माधव भंडारी, कांताताई नलावडे, जिल्हाध्यक्ष अनिल ठाकूर, चेंबूर विधानसभा अध्यक्ष राहुल वाळंज, पालिकेतील गट नेते मनोज कोटक यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)