Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी करत शिवसेनेला मोठेच खिंडार पाडले. यानंतर महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत नवे सरकार स्थापन केले. यानंतर भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी आपापल्या नेत्यांना सूचना देत, एकमेकांच्या मतदारसंघात घुसखोरी न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. फोडाफोडीचे रुपांतर संघर्षात होईल, यामुळे दोन्ही पक्षांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले. मात्र, शिंदे गटाने याला मूठमाती दिल्याचे सांगितले जात आहे. मुंबईतील भाजप आमदारावर नाराज असलेल्या एका नेत्याने थेट शिंदे गटात प्रवेश केल्याबाबत माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट आगामी मुंबई महानगरपालिकेच्या तयारीसाठी लागला असून, पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. शिंदे गटातील आमदार, नगरसेवक यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मुंबईतील भाजप आमदारावर नाराज असलेल्या एका नेत्याने आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली थेट शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.
यादव दाम्पत्याचा शिंदे गटात प्रवेश
बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली राम यादव आणि रेखा यादव यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यादव दाम्पत्याने भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांच्यावर राजकीय कोंडी करत असल्याचा आरोप केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राम यादव यांनी शिंदे गटात प्रवेश करणे, हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. राम यादव यांच्या प्रवेशाने शिंदे गटाला उत्तर भारतीय समाजाला आकर्षित करणारा एक नेता मिळाल्याची चर्चा आहे. ठाण्यानंतर मुंबईत बाळासाहेबांची शिवसेना रुजवण्यात एकनाथ शिंदे यांना मदत होईल, असा दावा केला जात आहे. मात्र, या कृतीमुळे भाजप आणि शिंदे गटाच्या कुरबुरी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राम यादव आणि रेखा यादव यांनी शिंदे गटात प्रवेश करतानाच्या कार्यक्रमात भाजपच्या स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्षपणे अनेक गंभीर आरोप केले आहेत. आमची सर्व नेत्यांवर नाराजी आहे. आम्ही महिला नेत्याच्या कार्यालयात जायचो तेव्हा त्यांनी आम्हाला बसून दिले जात नसे. आम्हाला त्यांची भेटही मिळत नव्हती, असे रेखा यादव यांनी म्हटले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"