Shishir Shinde News: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आपापल्या पक्षांना सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिशिर शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. ठाकरे गटाचे उपनेतेपद शिशिर शिंदे यांच्याकडे होते. या उपनेतेपदाचा राजीनामा शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तसे पत्र शिशिर शिंदे यांनी ठाकरेंना लिहिले आहे.
शिवसेना ठाकरे गटात मनासारखे काम मिळत नाही, म्हणून मी राजीनामा देत असल्याची खंत शिशिर शिंदे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. शिशिर शिंदे यांची १९ जून २०१८ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत घरवापसी झाली होती. चार वर्षांच्या कालावधीत माझे कर्तृत्व, संघटन कौशल्य, हातात घेतलेले काम फत्ते करण्याची जबरदस्त जिद्द, समाजाच्या विविध क्षेत्रात असलेले जिव्हाळ्याचे संबंध या सर्व बाबी दुर्लक्षित करण्यात आल्या याची मला खंत वाटते. चार वर्षात माझे नेतृत्व आणि कौशल्याकडे ठाकरे गटानं दुर्लक्ष केलं. माझी घुसमट मी थांबवतो, असे शिशिर शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
माझ्या आयुष्यातील ४ वर्षे वाया गेली
माझ्या जीवनातली चार अमूल्य वर्षे फुकट गेली अशी माझी धारणा आहे. ३० जून २०२२ रोजी माझी "शिवसेना उपनेते" म्हणून नियुक्ती अचानकपणे झाली. जबाबदारी नसलेले शोभेचे पद मिळाले, असा टोलाही शिंदे यांनी आपल्या पत्रातून लगावला. शिशिर शिंदे हे २००९ ला भांडुप विधानसभा मतदार संघातून आमदारपदी निवडून आले होते. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
दरम्यान, मातोश्रीवर जात शिशिर शिंदे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केल्याचे सांगितले जात आहे. घरवापसीनंतर तब्बल ४ वर्ष पक्षात राजकीय पुनर्वसनासाठी वाट पाहावी लागली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिशिर शिंदे यांची पक्षाच्या उपनेते पदी वर्णी लागली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात सुरू झालेल्या घडामोडींमध्ये शिशिर शिंदे यांना उपनेते करण्यात आले. आधी शिवसेना मग मनसे अन् पुन्हा शिवसेना असा त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास राहिला.