Join us

मोहरमनिमित्त आज मोठा बंदोबस्त

By admin | Published: October 12, 2016 5:21 AM

नवरात्रौत्सवात कार्यरत असलेले पोलीस आता बुधवारी होत असलेल्या मोहरमनिमित्त बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत. मुस्लीम धर्मीयांत महत्त्वपूर्ण

मुंबई : नवरात्रौत्सवात कार्यरत असलेले पोलीस आता बुधवारी होत असलेल्या मोहरमनिमित्त बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत. मुस्लीम धर्मीयांत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या दिवसामुळे दक्षिण मुंबईत भेंडी बाजारसह शहर, उपनगरांत ठिकठिकाणी मिरवणूक काढली जाते. त्या वेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.विशेष बंदोबस्तामुळे दसऱ्याबरोबरच मोहरमसाठी पोलिसांच्या साप्ताहिक सुटी, रजा रद्द करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. उरी येथील लष्करी तळावर पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे दोन्ही देशांतील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशातील महत्त्वाच्या ठिकाणी अतिरेक्यांकडून घातपाती कृत्य होण्याच्या शक्यतेने गुप्तचर यंत्रणांनी अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. दसरा, मोहरम व दिवाळीची धामधूम सुरू असताना या काळात समाजकंटकांकडून गैरकृत्य होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. इस्लामचे प्रेषित महंमद पैंगबर यांचे नातू हजरत हुसेन मोहरम महिन्यातील नऊ तारखेला शत्रूबरोबर लढताना शहीद झाले. त्या दिवसाच्या स्मृती जागत्या ठेवण्यासाठी मुस्लीम बांधवांकडून शोक व्यक्त केला जातो. त्यामुळे महंमद अली रोड, पायधुनीसह शहर व उपनगरांतील मुस्लीमबहुल भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)