Join us

मोठ्ठा आवाज झाला, बोट जागेवरच थांबली, अन्.....; जाणून घ्या अपघातग्रस्त बोटीत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 8:31 PM

शिवसंग्राम संघटनेचे आम्ही जवळपास 22 कार्यकर्ते शिवस्मारक पायाभरणी कार्यक्रमासाठी समुद्रात निघालो होतो. त्यावेळी बोटीची क्षमता लक्षात घेऊन

मुंबई - शिवस्मारकच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी गेलेल्या स्पीडबोटीला अरबी समुद्रात अपघात झाला. या बोटीत विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेचे 18 ते 20 कार्यकर्ते होते. मात्र, या दुर्दैवी अपघातात सिद्धेश पवार नावाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यु झाल्याची माहिती आहे. प्रसंगावधानता राखल्यामुळे सुदैवाने बोटीवरील इतर सर्वांना जीव वाचला. पण, आपला जीव वाचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी केलेली जीवघेणी धडपड चेतन पालकर यांनी सांगितली. मृत्युच्या दाढेतून निसटल्याचा थरारक अनुभव चेतन यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितला.

शिवसंग्राम संघटनेचे आम्ही जवळपास 22 कार्यकर्ते शिवस्मारक पायाभरणी कार्यक्रमासाठी समुद्रात निघालो होतो. त्यावेळी बोटीची क्षमता लक्षात घेऊन अगोदरच 4 ते 5 कार्यकर्त्यांना बोटीतून बाहेर काढण्यात आलं होतं. दुपारी 3.30 च्या सुमारास बोट शिवस्मारकाच्या दिशेनं निघाली. मात्र, वाटेतच मोठ्ठा आवाज झाला अन् बोट जागेवरच थांबली. बोट अचानक थांबवल्यामुळे बोटीवरील सर्वचजण घाबरले. याबाबत बोटचालकास विचारणा केल्यानंतर, बोटचा मागील पंखा तुटल्याचे चालकाने सांगितले. मात्र, क्षणार्धात बोटीत पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. पण, घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आणि प्रसंगावधानता राखत आम्ही बादलीने बोटीतील पाणी बाहेर काढलं, असा थरारक अनुभव चेतन यांनी सांगितला.

पुढे बोलताना चेतन म्हणाले, घडलेली घटना संबंधित यंत्रणांना सांगण्यात आली होती. त्यामुळे आम्हाला मदत पाठवण्यात आली. पण, मदत येईपर्यंत अर्धी बोट पाण्यात बुडाली होती. सुदैवाने सर्वजण बोटीतून बाहेर पडलो. या बोटीतून शेवटचा बाहेर पडणारा कार्यकर्ता मीच आहे, माझ्यानंतर बोटचालकच या बोटीतून बाहेर पडला. बोटीत 20 ते 22 जण असतानाही केवळ सहाच लाईफजॅकेट असल्याचेही चेतन यांनी सांगितले. कदाचित बोटीचा मार्ग माहित नसल्याने ही दुर्घटना घडली असावी, असेही चेतन यांनी म्हटले. मात्र, हा थरारक अनुभव सांगतानाही चेतन यांच्या चेहऱ्यावर सुदैवाने बवाचल्याचे भाव स्पष्ट दिसत होते.

पाहा व्हिडीओ - 

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजमुंबईसागरी महामार्गबोट क्लब