Join us

Shivsena: मोठा ट्विस्ट, वडिल गजानन किर्तीकर शिंदेगटात पण मुलगा उद्धव ठाकरेंसोबतच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 11:47 PM

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी गळाभेट घेत गजानन किर्तीकर यांचे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात स्वागत केले.

मुंबई - बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी शिदें गटात म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. अगोदरच शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात गेले आहेत. त्यातच, गेल्या काही दिवसांपासून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदेंसोबत गेल्याने शिंदे गटातील खासदारांची संख्या आता १३ वर पोहोचली आहे. मात्र, किर्तीकरांच्या या पक्षप्रवेशात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. कारण, गजानन किर्तीकर यांचा मुलगा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच असणार आहे. 

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी गळाभेट घेत गजानन किर्तीकर यांचे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून गजानन किर्तीकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. दुसरीकडे गजानन किर्तीकर यांचा मुलगा अमोल हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आपण, वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे. वडिलांचा हा निर्णय वैयक्तिक असल्याचं अमोल यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच अमोल किर्तीकर यांची शिवसेना उपनेते पदावर नियुक्ती केली आहे. त्यामुळेच, ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचंच काम पाहणार आहेत.

यापूर्वी मुलामुळेच बदलला होता निर्णय 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकतीच अमोल किर्तीकर यांची शिवसेना उपनेते पदावर नियुक्ती केली. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात सामील होण्याला वडिलांना विरोध केला. शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संकटात आहे. अशावेळी आपण उद्धव ठाकरेंना सोडलं तर देव मला माफ करणार नाही, जगात माझ्यासारखा मतलबी माणूस सापडायचा नाही' अशी भावना अमोल किर्तीकर यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर कीर्तिकरांनी आपला निर्णय बदलल्याचं वृत्त माध्यमांत आलं होतं.

शिवसेना नेते पदावरुन हकालपट्टी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेण्यासाठी गजानन किर्तीकर आले होते. त्यानंतर, मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी रामदास कदम यांना जादू की झप्पी देत दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी आनंद व्यक्त केला. या प्रवेशामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील शिवसेना नेते पदावरुन गजानन किर्तीकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आल्याचे पत्र प्रसिद्धीसाठी देण्यात आले आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदेगजानन कीर्तीकर