मोठा ट्विस्ट! नाराज छगन भुजबळ CM देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; घडामोडींना वेग, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 11:39 IST2024-12-23T11:37:47+5:302024-12-23T11:39:34+5:30
Chhagan Bhujbal Meet CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी छगन भुजबळ सागर बंगल्यावर दाखल झाले. यावेळी समीर भुजबळ हेही तिथे उपस्थित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मोठा ट्विस्ट! नाराज छगन भुजबळ CM देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; घडामोडींना वेग, चर्चांना उधाण
Chhagan Bhujbal Meet CM Devendra Fadnavis: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ फारच नाराज झाले आहेत. मंत्रिमंडळाच्या शर्यतीतून आपले नाव बाद झाल्याचे लक्षात येताच छगन भुजबळ यांनी तातडीने सभा, बैठका घेऊन दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केली. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. यातच नाराज असलेले छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईमध्ये ओबीसी बहुजन आघाडीची बैठक झाली. या बैठकीत छगन भुजबळांना पाठिंबा देण्याचा निर्धार ओबीसी नेत्यांनी केला. या बैठकीनंतर आपली भूमिका स्पष्ट करताना छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर टीका केली. वेगवेगळ्या ओबीसी संघटना आहेत, त्यांची बैठक झाली. त्यांनी सांगितले आम्हाला भेटायचे आहे, त्यांनी त्यांची मते मांडली. तुम्ही ओबीसींचा आवाज उठवणारे आहात. राज्यात, विधानसभेत, तुम्हाला बाहेर ठेवले, यात काहीतरी गौडबंगाल आहे. आम्हाला भीती वाटते. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आम्ही राज्यभर हा प्रश्न घेऊन जाऊ आणि जागरूकता करू, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी या बैठकीत मांडल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. यानंतर आता छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे म्हटले जात आहे.
नाराज छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; घडामोडींना वेग
प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी छगन भुजबळ सागर बंगल्यावर दाखल झाले. यावेळी समीर भुजबळ हेही तिथे उपस्थित असल्याची माहिती देण्यात आली आहे. सुमारे ४० मिनिटे ही बैठक चालली. छगन भुजबळ हे कुठला वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत नेमकी कुठल्या विषयांवर चर्चा होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर छगन भुजबळ नेमका काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भुजबळ हे ओबीसी नेते आहेत, त्यांना मंत्रिमंडळात न घेतल्याने त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. काही समर्थकांनी आता भाजपसोबत चला असे जाहीरपणे आवाहन केले आहे. या आवाहनाला ते प्रतिसाद देतील का, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.