माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने पुण्यातून आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. बुधवारी रात्री पुण्यातून पकडलेल्या या आरोपींना मुंबईत आणण्यात आले असून, तपासात त्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अटकेनंतर आतापर्यंत या प्रकरणात एकूण १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
तपासादरम्यान आरोपींना त्यांच्या टार्गेटची संपूर्ण माहिती असल्याचे समोर आले. हत्या करण्यासाठी त्यांच्याकडे शस्त्रे लपवून ठेवली होती, त्यांच्याकडून सुमारे ४० गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. फरार आरोपी शुभम लोणकर याने या दोघांना हत्येत वापरण्यासाठी शस्त्रे पुरवली होती आणि ती लपवून ठेवण्यास सांगितले होते. या प्रकरणी पोलिसांनी आता आरोपींची चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीचा थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेने शनिवारी महानगर दंडाधिकारी न्यायालयात ही माहिती दिली. त्यानुसार तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याने सिद्दिकी यांचे वांद्रे पश्चिमेतील घर, कार्यालय आणि मुलगा झीशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाची रेकी करण्याचे काम सोपवले होते. ३२ वर्षीय सुजित सुशील सिंह याला पंजाबमधून अटक करण्यात आली. पंजाब पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत सिंहला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पाच जणांना वाँटेड घोषित केले
सुजित सिंहच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली. तो अनमोल बिश्नोईच्या संपर्कात असल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्येसाठी वापरलेली शस्त्रे मिळवून ती नितीन सप्रे आणि राम फूलचंद कनोजिया याच्यापर्यंत पोहोचवण्यातही त्याचा सहभाग होता. यानंतर त्याने ते शुटरांच्या ताब्यात दिले. सप्रे आणि कनोजिया या दोघांनी सिद्दिकी आणि त्यांच्या मुलाच्या घराची आणि कार्यालयांची तपासणी केली होती. शनिवारी पोलिसांनी अनमोल बिश्नोई, शुभम लोणकर, झीशान अख्तर आणि शूटर शिवकुमार गौतम याला या प्रकरणी वाँटेड घोषित केले.
यापूर्वी, दिल्ली पोलिसांच्या विशेष युनिटने, लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्ध कारवाई करताना, राजस्थानच्या माजी आमदाराच्या नातेवाईकाला लक्ष्य करण्याचा कट रचणाऱ्या ७ नेमबाजांना अटक केली होती. एका वेगळ्या पण संबंधित घटनेत, दिल्ली पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई आणि कला जाठेदी टोळीतील आणखी एका सदस्याला अटक केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.