जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणार होते. परंतू, पूर्वसंध्येलाच ओडिशात भीषण रेल्वे अपघात घडल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. आता मुंबई-गोवा वंदे भारतसह देशभरातील ५ वंदे भारत रुटवर ट्रेन सुरु करण्यासाठी उद्या मोदी हिरवा झेंडा दाखविणार आहेत. या दरम्यान मुंबई गोवा वंदे भारतबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.
वंदे भारतला २७ जूनला मोदी हिरवा झेंडा दाखविणार आहेत. सुरुवातीला वंदे भारत मुंबई गोवा कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातून तीनच दिवस चालविली जाणार आहे. पावसाळी वेळापत्रकामुळे हा बदल असणार आहे. सामान्य वेळापत्रकानुसार वंदे भारत आठवड्याचे सहा दिवस या मार्गावर धावणार आहे.
पावसाळी वेळापत्रकानुसार दरड कोसळण्याची शक्यता, दृष्यमान आदी कारणांमुळे कोकण रेल्वेवर वेगाचे लिमिट आहे. या लिमिटमुळे वंदे भारत ८० किमी प्रति तासच्या वेगापुढे धावू शकणार नाही. यामुळे सामान्य दिवसांपेक्षा पावसाळ्यात वंदे भारतला मुंबई ते गोवा किंवा गोवा ते मुंबई अंतर कापण्यासाठी वेळ लागणार आहे. यामुळे ही एक्स्प्रेस एक दिवसाआड सुरु ठेवण्यात येणार आहे.
इतर दिवशी मुंबईहून निघणारी वंदे भारत ही आठवड्यातून एकदाच म्हणजे शुक्रवारी धावणार नाही. तर पावसाळी वेळापत्राकानुसार मुंबईहून सुटणारी वंदे भारत ही मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी निघणार आहे. वंदे भारत ही या तीन दिवसांना सीएएमटीवरून सकाळी ५.३२ वाजता सुटेल तर १० तासांनी ती मडगावला दुपारी साडेतीनला पोहोचणार आहे.
गोव्यावरून परतीच्या प्रवासाला निघताना वंदे भारत ही आठवड्यातून तीन दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुटणार आहे. मडगावहून ही ट्रेन दुपारी १२.२० वाजता सुटणार आहे. तर सीएमएमटीला ही ट्रेन रात्री १०.२५ वाजता पोहोचणार आहे. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
पावसाळ्यातच १० तासांचा प्रवास...वंदे भारत ट्रेनला पावसाळ्यातच मुंबई ते गोवा गाठण्यासाठी दहा तास लागणार आहेत. इतर वेळी 586km चे अंतर आणि ११ स्थानकांवर थांबण्यासाठी 7.50 तास लागणार आहेत. सध्याच्या कोकण रेल्वे मार्गावरील वेगवान ट्रेनला हे अंतर कापण्यासाठी ८.५० तासांचा वेळ लागत आहे.
मुंबई-गोवा वंदे भारतचे तिकीट किती असेल?मुंबई-मडगावदरम्यान धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसचे एसी चेअरकारचे तिकीट ९९० रुपये तर एक्झिक्युटिव्ह व्हिस्टाडोम कोचचे तिकीट २४९५ रुपये एवढे आहे. तर मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेस एसी चेअरकारचे तिकीट दर १६१०, एसी एक्झिक्युटिव्ह कोचचे तिकीट ३१३० आणि एक्झिक्युटिव्ह व्हिस्टाडोम कोचचे तिकीट २९१५ रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-मडगाव मार्गावरील सेमी हायस्पीड ट्रेन असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस प्रवासासाठी एसी चेअरकारचे तिकीट १४३५ रुपये तर एक्झिक्युटिव्ह कारसाठी २९१५ रुपये एवढे तिकीट दर असू शकतात, असे सांगितले जात आहे. यात बदल होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.