कोरोनाचा सर्वाधिक फटका बेघरांना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 03:02 PM2020-10-06T15:02:05+5:302020-10-06T15:02:34+5:30
Homeless People : वादा ना तोडो अभियान
मुंबई : देशभरातील ६३.६७ दशलक्ष शहरी आणि ग्रामीण कुटूंबाकडे पुरेशी घरे नसून, कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका या कुटूंबाना बसला आहे. वादा ना तोडो अभियान या राष्ट्रीय मोहीमेने कोविड काळात विविध घटकांचा परामर्श घेत २०१९-२०२० चा अहवाल प्रसिध्द केला आहे. यात स्थलांतरित कामगारांसह घरे, गरिबी, शिक्षण अशा विविध घटकांचा आढावा घेतला आहे. या अहवालानुसार हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
दाटीवाटीने वसलेल्या झोपड्यांत सामाजिक अंतर ठेवून जगायचे कसे? या प्रश्नांचे उत्तर कोणाकडेच नाही. कोरोनामुळे स्वच्छतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्यांच्या स्वत:च्या हक्काचे घर नाही. जे नागरिक फ्लाय ओव्हर अथवा रस्त्यालगत राहतात; अशा बेघरांचेही कोरोनामुळे मोठे हाल झाले आहेत. हातावर पोट असणा-या स्थलांतरित कामगारांचा तर ठावठिकाणा राहिलेला नाही, असे युवा संस्थेचे वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक नामदेव गुलदगड यांनी सांगितले.
सुमारे २०० दशलक्ष लोकांनी त्यांचे उपजिवीकेचे साधन गमावले. यातील बहुतांशी लोक अनौपचारिक क्षेत्रातील आहेत. एका अंदाजानुसार, भारतात सुमारे १०० दशलक्ष स्थलांतरित कामगार आहेत; जे देशाच्या सकल देशातंर्गत उत्पादनात १० टक्क्यांहून अधिक हातभार लावूनही कामगार आणि नागरिक म्हणून त्यांच्याकडे हक्काकडे दुर्लक्ष केले जाते.
-----------------
अहवाल काय म्हणतो
- रस्ते, गटारे, सांडपाणी व्यवस्था, उद्याने, कच-याची विल्हेवाट, व्यवस्थापन, रुग्णालये, शाळा पुरवून सध्या अस्तित्वात असलेल्या झोपड्यांचे किफायतशीर मॉडेलमध्ये रुपांतर करण्यात यावे.
- भाड्याने स्वस्त धोरणास अनुसरुन स्थलांतरितांसाठी आणि कामगारांसाठी घरे, निवारा धोरण विकसित व समाविष्ठ करण्यात यावे.
- राज्याच्या पुढाकाराने भाड्याने घरे आणि कामगारांसाठी वसतीगृहे पुरविली जावीत.
- शहरी भागांत स्थलांतरित मजुरांसाठी जीवनमान कौशल्यांचा आणि जीवनमान हमी योजनेचा समावेश करण्यात यावा.
- स्थलांतरित मजुरांसाठी योजना तयार करण्यासाठी केंद्रिय समितीची स्थापना करावी.
- सर्व बेघरांना कायम स्वरुपी घरे उपलब्ध करून देण्यासाठी निश्चित मुदत असलेले शहरी बेघरांसाठी राष्ट्रीय धोरण तयार करा.
- नाव नोंदणी अभियान राबवून शहरी बेघरांना कायदेशीर ओळख देण्यात यावी.
-----------------
शासनाच्या सर्वेनुसार मुंबईतील बेघरांची संख्या ही ५४ हजार ४१६
अभ्यासानुसार ही संख्या दोन लाखांपेक्षा जास्त
१ लाख लोकसंख्येच्या पाठीमागे एक निवारागृह गरजेचे
१२५ निवारा गृहे आवश्यक
२०१४ ते २०१९ महानगरपालिकेच्या अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या निवारागृहांची आकडेवारी ९
१० निवारागृहे ही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून चालत आहेत
-----------------
- भारतात ०.३१ मिलियन लोक बेघर आहेत.
- ०.२३ मिलियन बेघर लोक हे निवारा गृहात राहताना दिसुन येतात.
- २०१७ अहवालानुसार आतापर्यंत १,३३१ निवारागृहांना अनुमती दिली आहे.
- त्यातील फक्त ७८९ (५९%) निवारागृहे सध्या सुरु आहेत.
- एकूण बेघर लोकसंख्येच्या ४.५ % लोकसंख्येला निवारा आहे.
- आकडेवारीनुसार भारतात १६,९३९ निवारा गृहांची बेघरांसाठी आवश्यकता आहे.