मुंबई : आपल्यासमोर खूप आव्हाने आहेत. सगळ्यात मोठे आव्हान वायुप्रदूषणाचे आहे. आपल्याला समस्यांना तोंड द्यावे लागले की समस्या आहेत याची आपल्याला जाणीव होते. या विषयांवर काम करताना माहिती गोळा करणे गरजेचे आहे. यासाठी तंत्रज्ञानाची जोडदेखील महत्त्वाची आहे, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव म्हणाले.
ब्लूमबर्ग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आयआयटी कानपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वायुप्रदूषणाच्या नोंदी व यासाठी वापरायचे तंत्रज्ञान’ या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये सुधीर श्रीवास्तव बोलत होते, तर आयआयटी कानपूरचे प्रो. एस. एन. त्रिपाठी यांनी सध्या वायुप्रदूषणाच्या नोंदीबाबत उल्लेखनीय पावले उचलली जात असून, त्यास तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे, असे नमूद केले. दरम्यान, यावेळी वायुप्रदूषणाची नोंद घेण्यासाठी तंत्रज्ञानाची कशी मदत घेतली जात आहे, वायुप्रदूषणाची माहिती कशी गोळा केली जात आहे, मुंबई किंवा येथील परिसरातील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी कोणती उल्लेखनीय पावले उचलणे अपेक्षित आहे? अशा अनेक मुद्यांवर उपस्थितांनी चर्चा करत याबाबत तंत्रज्ञानाच्या जोडीने अद्ययावत काम करता येईल; या मुद्यावर जोर दिला.