सर्वात मोठी समस्या ग्लोबल वार्मिंग- आचार्य डॉ. लोकेश मुनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 02:12 AM2019-06-06T02:12:52+5:302019-06-06T02:13:02+5:30
जागतिक पर्यावरण दिन : ‘सुसंवाद आणि शांततेसाठी पर्यावरणाचे संरक्षण’ या विषयावर परिषद
मुंबई : ग्लोबल वार्मिंग, हिंसा व आतंकवाद, गरिबी या जगातील तीन मोठ्या समस्या आहेत. जगात सर्वाधिक अकाली मृत्यू ग्लोबल वार्मिंगमुळे होत आहे. ही समस्या एका राज्याची किंवा देशाची नसून संपूर्ण जगाची आहे. याचा विचार करून अहिंसा विश्व भारतीने प्रयत्न केला की, विश्वविख्यात धर्मगुरू एकाच व्यासपीठावर येतील आणि नागरिकांना पर्यावरणासंबंधी मार्गदर्शन करतील. यातूनच धर्मगुरूंनी जर मार्ग दाखविला, तर सरकारी कोट्यवधी रुपये खर्च करूनसुद्धा काम होत नसतील, तर ती कामे धर्मगुरूंच्या माध्यमातून होऊ शकेल, असे प्रतिपादन आचार्य डॉ.लोकेश मुनी यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अहिंसा विश्व भारती संस्थेतर्फे ‘सुसंवाद आणि शांततेसाठी पर्यावरणाचे संरक्षण’ या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. वरळी येथील एनएससीआय डोम येथे बुधवारी हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी, इशा फाउंडेशनचे सद्गुरू जग्गी वासुदेव, पतंजली योगपीठाचे संस्थापक योग ऋषी रामदेव बाबा, ब्रह्मकुमारी परिवारातून डॉ. बीके शिवानी यांची उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी यांनी सांगितले की, पृथ्वीचे तापमान वाढू लागले आहे. बर्फ वितळत आहेत. ओझोनचे नुकसान होत आहे. चेन्नईमध्ये पाच हजार पाण्याचे टँकर दररोज रस्त्यावरून धावत नागरिकांना पाण्याचा पुरवठा करत आहेत. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती यांचा अनावश्यक उपयोग करू नका. अनावश्यक छेदन-भेदन करू नका. पाणी स्वयंम जीव आहे. पदार्थ सीमित असून इच्छा असिम आहेत. असिम इच्छाची पूर्ती ससिम पदार्थ करू शकत नाहीत. त्यामुळे आपण भोग आणि उपभोगांचे सीमाकरण करत आहोत. आमचा विकासाला विरोध नाही आहे. पतंजली योगपीठाचे संस्थापक योग ऋषी रामदेव बाबा यांनी सांगितले की, प्रकृतीला आपण आई मानतो. प्रकृतीपासून जसे दूर जातो, तशी विकृती निर्माण होते. भारतीय संस्कृतीचे मुल तत्त्व चार आहेत.
सम्यक मती, सम्यक भक्ती, सम्यक कृती आणि सम्यक संतुलित प्रकृती ही भारतीय संस्कृती आहे. शहरात सर्वात जास्त प्रदूषण आणि रेडिएशन आहे. जगामध्ये भविष्यात निसर्ग व पर्यावरण, डेटा बँक व कृत्रिम बुद्धिमता या मुख्य तीन समस्या निर्माण होणार आहे. या तिन्हींवर बुद्धीने काम करणे आवश्यक आहे. पृथ्वीला धोका हा मानवापासून असून, त्याचे समाधानही मानवाकडेच आहे.
ब्रह्मकुमारी परिवारातून डॉ. बीके शिवानी यांनी सांगितले की, मनातल्या स्थितीचा प्रभाव हा अंग, वृक्ष आणि पाणी यांच्यावर पडत असतो. जगभरातील लोकांना स्क्रीनची सवय जास्त झाली आहे. त्यामुळे दोन्ही व्यक्तीमधील व्हायब्रेशनची देवाण-घेवाण होत नाही. पर्यावरण सर्वात मोठा प्रभाव हा विचारांचा आहे. पर्यावरणावर आपल्या भावनांचे नाते जोडलेले आहे. आपल्या भावनांकडे लक्ष नाही दिले आणि पर्यावरणाला बाहेरून सुधारणा करण्याचा विचार करत असू, तर आपल्याला १०० टक्के निकाल मिळणार नाही.
पर्यावरणाचा मुख्य घटक नदी असून, नदीचे प्रदूषण झपाट्याने होत आहे. त्यामुळे नद्यांचे संरक्षण व संवर्धन करा. देशामध्ये प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली असून, त्यावर उपायही आपल्याकडे आहेत. वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळू लागल्याने समुद्राची पातळी वाढत आहे. देशातील कृषी जमिन कमी होत असून, त्यावर बांधकामे वाढू लागली आहेत. नागरिकांनी अधिकाधिक झाडे लावली पाहिजे. झाडे लावल्याने प्रदूषण कमी होईल. - सद्गुरू जग्गी वासुदेव, इशा फाउंडेशन.