बिहारही पेटले; राज्यभर रेल्वे आणि रास्तारोको, यूपीतील मृतांची संख्या १७
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 06:42 AM2019-12-22T06:42:35+5:302019-12-22T06:53:07+5:30
दिल्लीतील कॉग्रेस कार्यकर्ते रविवारी राजभवनासमोर
पाटणा/लखनौ : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्ली व उत्तर प्रदेशातील हिंसक आंदोलन शमण्याआधीच शनिवारी संपूर्ण बिहारमध्ये आंदोलन पेटले. लालुप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने या कायद्याच्या विरोधात बिहार बंदचे आवाहन केले होते. या आंदोलनाच्या काळात निदर्शकांनी रेल्वेगाड्या रोखल्या आणि टायर्स व काही वाहने पेटवून रस्तेही अडविले. मात्र, पोलिसांनी आंदोलन नीट हाताळल्याने हिंसाचार झाला नाही. काही ठिकाणी पोलिसांनी लाठीमार करून आंदोलकांना पांगविले.
उत्तर प्रदेशात शुक्रवारी झालेल्या आंदोलनाच्या वेळी गोळीबारात मरण पावलेल्यांची संख्या आता १७ झाली आहे. उत्तर प्रदेशाच्या अनेक जिल्ह्यांत आजही आंदोलनाला हिंसक वळण लागले. उत्तर प्रदेशात काल झालेल्या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ११ हजार लोकांविरुद्ध गुन्हे नोंदविले असून, एक हजारांहून अधिक लोकांना अटक केली आहे, तसेच काही जिल्ह्यांमध्ये अद्याप तणाव असून, तेथील मोबाइल इंटरनेटसेवा बंदच आहे. संपूर्ण राज्यभर जमावबंदी आहे आणि पोलिसांबरोबरच राज्य राखीव पोलीस, केंद्रीय सुरक्षा दल आणि शीघ्र कृती दलाचे जवान राज्यभर रस्त्यांवर दिसत आहेत.
राहुल, सोनिया गांधी आंदोलनात उतरणार
दिल्लीतील कॉग्रेस कार्यकर्ते रविवारी राजभवनासमोर सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात धरणे धरणार आहेत. तिथे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी तसेच राहुल गांधी हेही जाणार आहेत. तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही या धरणे आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे.