Bihar Assembly Election 2020: बिहार निवडणुकीच्या मैदानात आता शिवसेनाही उतरणार?; पदाधिकाऱ्यांनी घेतली संजय राऊतांची भेट
By मुकेश चव्हाण | Published: October 3, 2020 08:52 AM2020-10-03T08:52:28+5:302020-10-03T09:01:18+5:30
बिहार निवडणुकीच्या मैदानात शिवसेनेने देखील उतरावे, अशी मागणी बिहारमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
मुंबई/ नवी दिल्ली: एकीकडे कोरोनामुळे चिंतेचे वातावरण असतानाच निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे बिहारमधील आणि देशातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सभा, प्रचार यावर अनेक निर्बंध घातले असले तरी सर्वपक्षीय नेत्यांकडून मोर्चेबांधणी आणि दावे-प्रतिदावे जोरात सुरू आहेत. याचदरम्यान बिहारमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुंबईत येऊन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये बिहार निवडणुकीच्या मैदानात शिवसेनेने देखील उतरावे, अशी मागणी बिहारमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
बिहार प्रमुख हौसलेंद्र शर्मां प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, बिहारमधील शिवसैनिक निवडणुक लढवण्यासाठी उत्सुक आहे. बिहारमधील कमीत-कमी 50 जागा लढवण्याचा विचार आहे. त्यामुळे यासंदर्भात बोलण्यासाठी आम्ही संजय राऊत यांनी भेट घेतली आहे. बिहारमधील शिवसैनिकांची जी मागणी आहे ती संजय राऊतांना सांगितली आहे. त्यामुळे आता निवडणुक लढवायची की नाही, यासंदर्भात अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतली असं हौसलेंद्र शर्मा यांनी सांगितले.
तत्पूर्वी, बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी विधानसभेच्या 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तारखांची घोषणा केली. त्यानुसार, बिहारमधील विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात होणार असून 28 ऑक्टोबर रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. तर, निवडणुकांचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बिहारचे प्रभारी म्हणून निवड
बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचारही डिजिटल पद्धतीने होणार असून बिहारची निवडणूक ही देशातील पहिली डिजिटल निवडणूक ठरणार आहे. तसेच .बिहार विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बिहार निवडणूकीकडे महाराष्ट्राचं देखील लक्ष लागलं आहे.
मतदानासाठी आणखी एक तासाचा कालावधी
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोरोनामुळे नवीन सुरक्षा नियमांनुसार निवडणुका घेण्यात येतील. मतदान केंद्रावर मतदारांची संख्या कमी असेल. एका बूथवर एक हजार मतदार असतील. तसेच यावेळी बिहार निवडणुकीत एक लाखांहून अधिक मतदान केंद्रे असतील. यावेळी मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे. बिहार निवडणुकीत मतदानासाठी आणखी एक तासाचा कालावधी ठेवण्यात आला आहे. म्हणजेच सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होईल. मात्र नक्षलग्रस्त भागात असं होणार नाही. तसेच शेवटच्या तासात कोरोनाचे रुग्ण मतदान करू शकतील"
6 लाख पीपीई किट, 46 लाखांहून अधिक मास्क आणि सॅनिटायझर्स
"कोरोनाच्या संकटात राज्य निवडणूक आयोगाला 6 लाख पीपीई किट देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त, निवडणुकीत 46 लाखांहून अधिक मास्क आणि सॅनिटायझर्सचा वापर केला जाणार आहे. पक्ष आणि उमेदवारांना व्हर्च्युअल निवडणूक प्रचार करावा लागणार आहे. कोरोनामुळे मोठ्या जाहीर सभा घेतल्या जाणार नाहीत. तसे उमेदवारीसाठी दोनपेक्षा जास्त वाहने कोणत्याही उमेदवारासह येऊ शकत नाहीत" अशी माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे.
कोविड रुग्णही करतील मतदान
कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करतच बिहारमधील विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली असून तीन टप्प्यात ही निवडणूक पार पडणार आहे. मात्र, कोविड रुग्णांना या निवडणुकीत मतदान करता येईल का? त्यांनी कसं मतदान करायचं? यांसह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कोविड रुग्णांसाठी मतदानाची वेळ निश्चित केली आहे. कोरोना रुग्णांसाठी मतदानाची स्वतंत्र व्यवस्था असून मतदान केंद्रावर शेटवच्या क्षणी ते मतदानाचा हक्क बजावतील. कोरोनाचं संकट लक्षात घेऊन एका मतदान केंद्रावर एक हजार मतदारांनाच मतदान करता येणार आहे.