नितीश कुमारांनी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, “विरोधकांचा प्रमुख चेहरा झाल्यास आनंद”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 04:51 PM2023-05-11T16:51:01+5:302023-05-11T16:52:08+5:30
Nitish Kumar Meet Sharad Pawar: भाजप देशविरोधी काम करत असून, देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न करत आहोत, असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे.
Nitish Kumar Meet Sharad Pawar: एकीकडे राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलचे अध्यक्ष तेजस्वी यादव मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.
या भेटीनंतर मीडियाशी बोलताना नितीश कुमार म्हणाले की, देशात भाजप जे काही करत आहे, ते चुकीचे आहे. भाजप देशविरोधी काम करत आहे. त्यामुळे देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्रित आल्यास लोकशाही वाचेल. त्याचाच एक भाग म्हणून शरद पवारांची भेट घेतली. इतरही विरोधी पक्षांच्या आम्ही भेटी घेऊ, अशी माहिती नितीश कुमार यांनी दिली. तसेच शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर वाईट वाटले होते. आमचे देखील हेचे म्हणणे होते की विरोधी पक्षांना तुमची गरज आहे, त्यामुळे राजीनामा मागे घ्या अशी आमची मागणी होती, असे नितीश कुमार यांनी नमूद केले.
विरोधकांचा प्रमुख चेहरा झाल्यास आनंद
भाजप देशविरोधी काम करत असून त्याच्याविरोधात देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. शरद पवार हे विरोधकांचा प्रमुख चेहरा झाल्यास आनंद वाटेल, असे नितीश कुमार यांनी सांगितले. यासंदर्भात शरद पवार म्हणाले की, देशातील लोकशाही वाचवायची असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. विरोधकांनी एकत्र राहिल्यास विजय निश्चित आहे. विरोधी पक्षाचा चेहरा कोण असावा याचा निर्णय नंतर घेतला जाईल, त्यामुळे सध्या सर्वांनी एकत्र येणे ही पहिली गरज आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत दिलेल्या निकालासंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने राज्यकर्त्यांबाबत तीव्र भूमिका मांडली आहे. काही निर्णय अद्याप येणे बाकी आहे. अपात्रतेचा निर्णय घ्यावा याबाबत अध्यक्षांना सांगितले आहे. राज्यपालांची भूमिका चुकीची राहिली होती याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिले आहे. नैतिकता आणि भाजपचा काही संबंध आहे असे वाटत नाही. ज्यांच्या नावावर निवडून येतात त्या पक्षाचा आदेश महत्त्वाचा आहे, असे शरद पवार म्हणाले.