मुंबई - कोरोना संकटाच्या काळात मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंमधील संवेदनशील आणि काळजीवाहू नेता प्रत्येकाने अनुभवला आहे. आपल्या भाषणावेळी ते सातत्याने महाराष्ट्राचा पालक असल्याचे सांगत आम्ही जबाबदारी घेतोय, तुम्ही खबरदारी घ्या, असे म्हणत नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत आहेत. राज्यातील जनतेची काळजी घेण्यासोबतच, मुंबई आणि महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांच्या राहण्याची व जेवणाची सोय याकडेही ते जातीने लक्ष घालत आहेत. यासंदर्भात यापूर्वीही ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बिहारच्या नितीशकुमार यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला होता. आता बिहारच्या एका आमदाराने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच फोन करुन बिहारमधील कामगारांची होत असलेली उपासमार सांगितली.
बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सरोज यादव यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करुन मुंबईत अडकलेल्या बिहारी नागरिकांची होत असलेली उपासमार लक्षात आणून दिली. यावेळी, उद्धव ठाकरेंनी अतिशय सौम्यपणे त्यांच्याशी संवाद साधला. तुम्ही काही काळजी करु नका, फक्त मला एखाद्या व्यक्तीचा नंबर द्या. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्याची जबाबादारी आमची, असे म्हणत स्वत: उद्धव ठाकरेंनी मोबाईल नंबर नोट करुन घेतला. उद्धव ठाकरेंचा हा संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातून पुन्हा एकदा त्यांच्यातील संवेदनशील माणूस नागरिकांना दिसून आला आहे.
महाराष्ट्रात आत्तापर्यंत ८७ हजार लोकांच्या जेवणाची आणि राहण्याची सोय आम्ही केली आहे. त्यामुळे, आपण फक्त आम्हाला संबधित लोकांचा पत्ता सांगा, मी त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवतो, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. त्यावेळी, रायगडमधील डोलवी येथे काही कामगार अडकल्याचं या आमदाराने सांगितलं. तसेच ठाण्यातील कोपरी पाखाडी येथेही काही कामगार अडकले आहेत. हरिवंश चौधरी या व्यक्तीचं नाव सांगून आमदार यादव यांनी उद्धव ठाकरेंना त्यांचा मोबाईल नंबर दिला. त्यावेळी, मुख्यमत्र्यांनी स्वत: हा मोबाईल नंबर नोट करुन घेतला. तसेच, तुम्ही काळजी करु नका, त्यांच्यापर्यंत मदत पोहचवणार, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. यानंतर, संबंधित आमदारने अतिशय नम्रपणे सर.. नमस्कारजी.. असे म्हणत फोन ठेवला.
सध्या सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंचा हा फोन रेकॉर्डींग ऑडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून मुख्यमंत्र्यांच्या विनम्रतेचं अन् तत्परतेचं कौतुक होतं आहे.