मुंबई : पंडित नेहरू ते थेट नरेंद्र मोदींपर्यंत अनेक पंतप्रधान उत्तर प्रदेशातून निवडून आले, तरीही त्या राज्याचा विकास झाला नाही. नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना स्थलांतर करावे लागते. इतर राज्यांत जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मारहाण, अपमान सहन करावा लागतो. आपल्या राज्यांचा विकास का केला नाही, असा प्रश्न तुम्ही या नेत्यांना का विचारत नाही? तुमचा स्वाभिमान गेला कुठे? अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी उत्तर भारतीयांवर प्रश्नांची सरबत्ती केली.उत्तर भारतीय महापंचायत समितीच्या व्यासपीठावरून राज ठाकरे यांनी प्रथमच उत्तर भारतीयांशी थेट संवाद साधला. ते म्हणाले, संघर्ष करायची मला इच्छा नाही, पण परिस्थिती बदलली नाही, तर राज्याराज्यांत संघर्ष होईल. म्हणून सांगतो, तुम्ही तुमच्या नेत्यांना उत्तर प्रदेश, बिहारची स्थिती सुधारायला सांगा. ६०च्या दशकात दाक्षिणात्यांच्या लोंढ्यांविरोधात मुंबईत आंदोलने झाली. त्यानंतर, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशसारख्या राज्यांनी उद्योगात प्रगती केली आणि लोंढे थांबले.हेच यूपी, बिहार, झारखंडबद्दल व्हायला हवे, असे मत त्यांनी मांडले.‘मेरे भाईयों और बहनो...’ म्हणत राज यांनी हिंदीतूनच भाषण केले. ते मंचावर आले, तेव्हा मंत्रोच्चाराने त्यांचे स्वागत करण्यात आले. ते म्हणाले, मी स्पष्टीकरण द्यायला नव्हे, तर उत्तर भारतीयांच्या मनातील गैरसमज दूर करायला आलो आहे. परप्रांतीय विशेषत: यूपी-बिहारमधील लोंढे, त्यांचा महाराष्ट्रावरील ताण, त्यांच्यामुळे राज्यात वाढलेली गुन्हेगारी या विषयावर सविस्तर भाष्य केले. माझी जी भूमिका आहे, त्यावर मी ठाम आहे. ती आज तुम्हाला हिंदीतून समजावण्यास आलो आहे. पहिल्यांदाच हिंदीत भाषण करतोय.माझ्या वडिलांचे हिंदी आणि उर्दूवर प्रभुत्व होते. त्यामुळे शाळेत असल्यापासूनच माझी हिंदी उत्तम आहे. ती खूप सुंदर भाषा आहे, पण ती भारताची राष्ट्रभाषा असेल, असा निर्णय कधी झालाच नव्हता. हिंदीसारखेच मराठी, कन्नड, मल्ल्याळम वगैरे भाषांना प्रादेशिक महत्त्व आहे, असे राज यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्राची लोकसंख्या साडे तेरा कोटी आहे. अनेक राज्यातून विशेषत: यूपी, बिहारमधून बहुतांश लोक इथे येतात. प्रत्येक शहराची, राज्याची लोकांना सामावून घेण्याची क्षमता असते. पण किती काळ महाराष्ट्र हा भार सोसणार? असा प्रश्नही राज यांनी केला.महाराष्ट्रात जे होते त्याची देशभर चर्चा होते. प्रत्येक राज्यात तेथील प्रादेशिक, भाषक अस्मितेसाठी संघर्ष होतात, पण माध्यमे त्यावर बोलत नाहीत. येथे पूर्वापार जे उत्तर भारतीय सुखेनैव नांदत आहेत, ज्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृती, अस्मितेला आपलेसे केले त्यांना महाराष्ट्रानेही सामावून घेतले आहे. ज्या राज्यात जाल, तिथले होऊन राहिले पाहिजे, तिथली भाषा अंगिकारली पाहिजे. परदेशात जाता तेव्हा हिंदीत बोलता का, असा प्रश्नही त्यांनी विचारला.अमिताभ बच्चनसारखा अभिनेताही जर भाषक अस्मिता जपत असेल, तर मी जपल्यास काय बिघडले? असा प्रश्न त्यांनी विचारला.निधी वाटपाबाबत महाराष्ट्रावर होणारा अन्याय मांडताना ते म्हणाले की, महाराष्ट्र जेव्हा केंद्राला १०० रुपये देतो, त्या बदल्यात महाराष्ट्राला १३ रुपये २० पैसे मिळतात. यूपी, बिहार सर्वात कमी योगदान देत असूनही त्यांच्यावर सर्वाधिक खर्च होतो तरीही तिथे बेरोजगारी, गरीबी आ वासून उभी आहे. मग तुम्ही पुन्हा महाराष्ट्रातच येणार हे किती वर्षे चालणार? मला महाराष्ट्राची प्रगती हवी आहे. तेच माझे काम आहे,’ असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.>उद्धव-राज दोघेही ‘युपी’त!उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरासाठी अयोध्या दौरा केला. त्यांनी उत्तर भारतीयांशी संवाद साधला, तर राज ठाकरे आज उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर गेले. कधीकाळी या दोघांनी मराठी भूमिपुत्रांसाठी उत्तर भारतीयांविरुद्ध आंदोलन छेडले होते. निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन त्यांनी हिंदी भाषिकांशी संपर्क वाढविला असल्याचे समजते.>संघर्ष करायची मला इच्छा नाही, पण परिस्थिती बदलली नाही, तर राज्याराज्यांत संघर्ष होईल. म्हणून सांगतो, तुम्ही तुमच्या नेत्यांना उत्तर प्रदेश, बिहारची स्थिती सुधारायला सांगा. - राज ठाकरे
यूपी, बिहारवासीयांनो, तुमचा स्वाभिमान गेला कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 6:50 AM