बिहार रेरा करणार महारेरा सलोखा मंचाचे अनुकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:05 AM2021-07-12T04:05:55+5:302021-07-12T04:05:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई ग्राहक पंचायतीच्या कल्पनेतून साकारलेल्या महारेरा सलोखा मंचाच्या गेल्या तीन वर्षांतील यशाने प्रभावित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई ग्राहक पंचायतीच्या कल्पनेतून साकारलेल्या महारेरा सलोखा मंचाच्या गेल्या तीन वर्षांतील यशाने प्रभावित होऊन बिहारमध्येसुद्धा अशाच प्रकारे सलोखा मंच लवकरच कार्यान्वित करण्यात येतील, असे बिहार रेरा अध्यक्ष नवीन वर्मा यांनी काल सायंकाळी पाटणा येथे जाहीर केले. मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांनी लोकमतला ही माहिती दिली.
मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे बिहार रेरा प्राधिकरणाचे अध्यक्ष, सचिव आणि सदस्य यांना दि, १० जुलैला ऑनलाइन सादरीकरण केले. महाराष्ट्रात सलोखा मंच कसे स्थापन झाले आणि सलोख्याने तक्रारींची सोडवणूक होणे हे तक्रारदारांच्या कसे हिताचे आहे हे ॲड. शिरीष देशपांडे यांनी विस्तृतपणे सादर केले. तर शर्मिला रानडे यांनी सलोखा मंचाची प्रत्यक्ष कामकाज पद्धती रंजक पद्धतीने सादर केली. सदर ऑनलाइन सादरीकरणानंतर बिहार रेरा अध्यक्षांनी मुंबई ग्राहक पंचायतीच्या याबाबतीतील योगदानाची प्रशंसा करत मुंबई ग्राहक पंचायतीच्या सहकार्याने बिहारमध्ये लवकरच सलोखा मंच अस्तित्वात येऊ शकतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
बिहार रेराच्या अन्य सदस्यांनी आता आम्ही बिहारमध्ये सक्षम सलोखा मंच स्थापन करण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकू असे मत व्यक्त केले असून, हे सलोखा मंच बिहारमध्ये कार्यान्वित करण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीच्या संपूर्ण सहकार्याची अपेक्षा बिहार रेरा अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. बिहारमध्ये महारेरा सलोखा मंचाची संकल्पना रुजवण्याचे मुख्य काम महारेराचे माजी अध्यक्ष गौतम चटर्जी यांनी केले. त्यानंतर बिहारमधील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची सांगड घालत प्राथमिक तयारी केल्यावर मुंबई ग्राहक पंचायतीने हे सादरीकरण केले.