मुंबई : रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत केलेल्या कारवाईत बिहारमधून राकेश कुमार मिश्राला (३०) अटक केली आहे. तो बेरोजगार असून त्याच्याकडे अधिक तपास सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनी सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या लॅंडलाईनवर अनोळखी व्यक्तिने कॉल करून रिलायन्स हॉस्पिटल तसेच अँटिलीयामध्ये बॉंबस्फोट करण्याची धमकी दिली. त्यानंतर सायंकाळी ५.४ वाजता पुन्हा कॉल करून मुकेश अंबानी आणि नीता अंबानी, आकाश आणि अनंत अंबानीला जीवेठार मारण्याची धमकी दिली.
हॉस्पिटल प्रशासनाने याची माहिती डी. बी. मार्ग पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. तर, पोलिसांनी रिलायन्स हॉस्पिटल आणि अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलिया या ठिकाणी पोलीस सुरक्षा वाढवली आहे.
पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तात्काळ वेगवेगळी पथके तयार करून आरोपीचा शोध सुरु केला. तो बिहारमध्ये असल्याचे समजताच बिहार पोलिसांच्या मदतीने त्याला बिहारच्या दरभंगा भागातून मध्यरात्री अटक केली आहे. त्याला घेऊन मुंबई पोलिसांचे पथक मुंबईला निघाले असून त्याने असे का केले? याबाबत त्याच्याकडे अधिक तपास सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.यापूर्वी मनोरुग्णाला अटक
ऑगस्ट महिन्यात रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या सार्वजनिक दूरध्वनी क्रमांकावर कॉल करुन प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन डी. बी. मार्ग पोलिसांनी धमकीचे ९ कॉल करणाऱ्या ५६ वर्षीय विष्णू भौमिक सराफाला बेड्या ठोकल्या. तो मानसिक रुग्ण असल्याचा दावा त्याच्या वकिलाने केला आहे. त्याचे दक्षिण मुंबईत ज्वेलरीचे दुकान आहे.