स्नेहा मोरेमुंबई : गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात प्रारंभ झालेला बाइक अॅम्ब्युलन्स उपक्रम ११ महिन्यांत तब्बल २ हजारांहून अधिक रुग्णांसाठी जीवनदायी ठरला आहे. मुंबई शहर-उपनगरांतील जवळपास २ हजार ८५४ रुग्णांवर या बाइक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून उपचार करण्यात आले आहेत.मुंबईमध्ये आॅगस्ट २०१७मध्ये १० बाइक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्यात आली. सध्या या सेवेसाठीच्या १०८ क्रमांकावर दिवसाला शेकडो कॉल येत आहेत. रेल्वे स्टेशन परिसर, चिंचोळ्या-अरुंद गल्ल्या अशा ठिकाणांहून कॉल येण्याचे प्रमाण जास्त आहे. मुंबईत भांडुप, मानखुर्द, धारावी, नागपाडा, मालाड, चारकोप, गोरेगाव, ठाकूर व्हिलेज, कलिना आणि खारदांडा या ठिकाणी बाइक अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या आहेत. बाइक अॅम्ब्युलन्सवर प्रशिक्षित पॅरामेडिक-डॉक्टर असल्याने फोन आल्यानंतर त्वरित प्रतिसाद दिला जातो. यामध्ये रुग्णाची प्राथमिक तपासणी आणि प्रथमोपचार केले जातात.आवश्यकता असेल, तर रुग्णाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येते. प्रथमोपचारासाठी लागणारे सर्व आवश्यक साहित्य या बाइक अॅम्ब्युलन्समध्ये आहे. राज्यातील प्रमुख शहरांतही अशाच ‘बाइक अॅम्ब्युलन्स’ सुरू करण्यात येणार आहेत.महाराष्टÑ चौथे राज्य : गुजरात, तामिळनाडू, कर्नाटकपाठोपाठ ‘बाइक अॅम्ब्युलन्स’ची सेवा सुरू करणारे महाराष्ट्र चौथे राज्य ठरले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. या अॅम्ब्युलन्ससाठी १०८ क्रमांकावर फोन आल्यानंतर तातडीने त्या भागातील ‘बाइक अॅम्ब्युलन्स’ संबंधित ठिकाणी पोहोचते. या बाइक अॅम्ब्युलन्समध्ये प्रथमोपचार ते आपत्कालीन उपचार साहित्य आहे. त्यात हृदयविकारावेळी द्यायची औषधे, आॅक्सिजन मास्क, विविध इंजेक्शन्स, गोळ्या, भाजलेल्या, बुडालेल्या रुग्णांसाठी आवश्यक साहित्य आहे.
बाइक अॅम्ब्युलन्स ठरतेय जीवनदायी; २ हजार ८५४ रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 2:42 AM