मुंबई, दि. 2 - एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत अॅम्ब्युलन्स वेळीच न पोहोचल्याने झालेला उशीर एखाद्याचं आयुष्य संपवू शकतो. मुंबईत तर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, याचा फटका अॅम्ब्युलन्सलाही बसतो. वाहतूक कोंडी आणि बेशिस्त चालकांमुळे अनेकदा अॅम्ब्युलन्सलाही तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहावं लागतं. अॅम्ब्युलन्स मागून येत असल्याचं दिसत असतानाही अनेक चालक रस्ता करुन देण्यास नकार देतात. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे ब-याच प्रमाणात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फायदा होणार आहे. सोबतच उपचाराअभावी होणा-या मृत्यूंचं प्रमाणही कमी होईल अशी अपेक्षा आहे.
राज्य सरकारने पुढाकार घेत ही बाईक अॅम्ब्युलन्स सुरु केली आहे. विशेष म्हणजे ही बाईक अत्यंत आधुनिक असून यामध्ये गरजेच्या सर्व सोयींची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रथोमपचारासाठी आवश्यक असणारं सर्व साहित्य या बाईक अॅम्ब्युलन्समध्ये उपलब्ध असणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या बाईक अॅम्ब्युलन्सवर एक प्रशिक्षित पॅरामेडिक-डॉक्टर असणार आहे.
'बाईक अॅम्ब्युलन्स' सेवा सुरु करणारं महाराष्ट्र चौथं राज्य आहे. याआधी गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये ही सेवा सुरु करण्यात आली आहे. सध्या मुंबईपुरती मर्यादित असणारी ही 'बाईक अॅम्ब्युलन्स' सेवा कालांतराने संपुर्ण राज्यभर सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे.
मुंबईतील भांडुप, मानखुर्द, नागपाडा, मालाड, चारकोप,गोरेगाव, ठाकूरगाव, कलिना आणि खारदांडा या भागात या ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ रस्त्यांवर धावताना दिसतील. या ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सेवेत, प्रशिक्षित डॉक्टरसह 10 मोटर बाईक आहेत. ज्यांना ही ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सेवा हवी असेल त्यांना 108 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. तुम्ही संपर्क साधल्यानंतर थोड्याच वेळात जवळ असलेली ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ तुमच्या घरी पोहोचेल.
या ‘बाईक अॅम्ब्युलन्स’वरील डॉक्टर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हातळण्यास सक्षम असल्याचा दावा आरोग्य विभागाचा आहे.
बाईक अॅम्ब्युलन्समध्ये काय काय असेल?- प्रथमोपचाराची आवश्यक साधने- आपत्कालीन उपाचार साहित्य- हार्ट अटॅकवेळी द्यावयाची औषधं- ऑक्सिजन मास्क- विविध इंजेक्शन, गोळ्या- भाजलेल्या, बुडालेल्या रुग्णांसाठी आवश्यक उपचार साहित्य
अनेकदा अॅम्ब्युलन्स वेळेत पोहोचली तरी हॉस्पिटलला जाणा-या रस्त्यांमध्ये वाहतूक कोंडीमुळे अडकून राहते. अशावेळी दोष वाहतूक कोंडीचा की बेशिस्त वाहनचालकांचा या प्रश्नावर वाद घालणं निरर्थक असतं. मात्र अशावेळी बाईक असेल तर एका बाजूने रस्ता काढत किंवा शॉर्टकटने हव्या त्या ठिकाणी पोहोचता येतं. त्यामुळे ही ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ जास्तीत जास्त लोकांसाठी वरदान ठरेल अशी अपेक्षा आहे.