बाइक अॅम्ब्युलन्स सुसाट..! आरोग्य विभागाची माहिती : 450 हून अधिक रुग्णांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 02:08 AM2017-10-09T02:08:48+5:302017-10-09T02:09:38+5:30
वाहतूककोंडीत रुग्णवाहिकेचे मार्गक्रमण सुलभ होण्यासाठी पर्यायी सेवा म्हणून सुरू झालेल्या ‘बाइक अॅम्ब्युलन्स’ आरोग्यसेवेला बळकटी देत आहेत.
मुंबई : वाहतूककोंडीत रुग्णवाहिकेचे मार्गक्रमण सुलभ होण्यासाठी पर्यायी सेवा म्हणून सुरू झालेल्या ‘बाइक अॅम्ब्युलन्स’ आरोग्यसेवेला बळकटी देत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकरांना आधार देणारी ही सेवा सध्या ‘सुसाट’ सुरू आहे. २ आॅगस्ट रोजी सुरू झालेल्या या सेवेने अवघ्या दोन महिन्यांत ४५०हून अधिक रुग्णांना नवसंजीवनी दिली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
रस्त्यावरील अपघात, सर्व गंभीर स्वरूपाचे रुग्ण, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत सापडलेले रुग्ण, हृदय रुग्ण, विषबाधा इ. आपत्कालीन परिस्थितीत या सेवेमार्फत रुग्णांना सुविधा पुरविण्यात येत आहे. सध्या मुंबई शहर-उपनगरांत १० बाइक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
ही सेवा १०८ या नि:शुल्क हेल्पलाइनच्या माध्यमातून उपलब्ध आहे. प्रकल्पासाठीच्या मोटारबाइक व वैद्यकीय उपकरणे यांसाठीच्या खर्चाची तरतूद राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
‘मोटार बाइक अॅम्ब्युलन्स’ रेल्वे स्टेशन, अग्निशमन केंद्र अशा महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात येत आहेत. गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांनंतर ही सेवा सुरू करणारे महाराष्ट्र देशातील चौथे राज्य आहे.