मराठा आरक्षणासाठी रविवारी मुंबईत बाईक रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:06 AM2021-06-25T04:06:25+5:302021-06-25T04:06:25+5:30
मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्याने समाजात अस्वस्थता आहे. मराठा समाजाच्या असंतोषाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती संघर्ष ...
मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्याने समाजात अस्वस्थता आहे. मराठा समाजाच्या असंतोषाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती संघर्ष मोर्चा, सकल मराठा समाज मुंबई यांच्यातर्फे रविवार, २७ जून रोजी मुंबईत दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे राजन घाग यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
राजन घाग म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी अनेक नेते आपापल्यापरीने आंदोलन करीत आहेत. परंतु, राज्य सरकारकडून प्रतिसाद मिळत नाही. खासदार संभाजीराजे हे राज्य सरकारसोबत सातत्याने बोलणी करीत आहेत. मात्र, यातून काहीच निष्पन्न होणार नाही. यापूर्वीच्या काळातही अशा बोलणी झाल्या होत्या. त्यामुळे आता आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे. दबावतंत्राचा वापर केला तरच आरक्षण मिळेल. मुस्लिम समाज व इतर संघटना या मराठा समाजाला पाठिंबा देणार असल्याचे घाग यांनी सांगितले.
बाईक रॅलीच्या मार्गाबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणे सुरू आहे. साधारण पूर्व द्रुतगती मार्गावरील एव्हराड नगर जंक्शन येथून याची सुरुवात होईल. सायन, माटुंगामार्गे जे.जे. पुलावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला रॅली पोहचेल, असे घाग यांनी सांगितले.