लोअर परळ पुलावर भीषण अपघात; डंपरच्या चाकाखाली आल्याने बीडीडी चाळीतील एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 03:49 PM2024-09-04T15:49:29+5:302024-09-04T15:55:24+5:30
Mumbai Accident : मुंबईच्या लोअर परळ परिसरात एका दुचाकीस्वाराचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Lower Parel Accident : मुंबईच्या लोअर परळ भागात मंगळवारी भीषण अपघाताची घटना समोर आली.लोअर परळच्या डिलाईल रोड पुलावर झालेल्या भीषण अपघातात एका ३२ वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. स्कूटीवरुन जात असताना तोल गेल्याने ही व्यक्ती डंपरच्या चाकाखाली आली. मागच्या चाकाखाली आल्याने स्कूटीवरील व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. डंपर चालकाने या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
वरळीतील बीडीडी चाळ येथील रहिवासी शैलेश सदाशिव शेट्टी हे स्कूटीवरून संध्याकाळी पाचच्या सुमारास डिलाईल रोड पुलावरुन करी रोडच्या दिशेने जात होते. पुलावरुन खाली उतरत असताना शेट्टी यांची गाडी घसरली आण डंपर ट्रकच्या चाकाखाली येऊन त्याचा दुर्दैवी अंत झाला. एनएम जोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेट्टी यांचा स्कूटरवरील ताबा सुटला आणि ते स्थिर होण्याच्या प्रयत्नात पुलाच्या बाजूला वळले. दुर्दैवाने, स्कूटर घसरत खाली गेली ज्यामुळे शेट्टी डंपर ट्रकच्या डाव्या मागच्या चाकाखाली खेचले गेले. चाकाखाली आल्यामुळे शेट्टी यांना गंभीर दुखापत झाली होती.
अपघातानंतर शेट्टी यांना तातडीने नायर रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तेथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस आता या अपघाताचे नेमके कारण शोधत आहेत. यांत्रिक बिघाड किंवा इतर कारणांमुळे संतुलन बिघडले की नाही हे शोधण्यासाठी शेट्टी यांची स्कूटर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.
दुसरीकडे, डंपर ट्रकचा चालक नवाजिश अब्दुल शाह याने तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि शेट्टी यांना रुग्णालयात नेण्यात मदत केली. शाहने पोलीस ठाण्यात जाऊन आपले म्हणणे मांडले. प्राथमिक तपासानंतर, पोलिसांनी या अपघातात शाहची चूक नसूनत्याच्यावर कोणतेही आरोप दाखल केले जाणार नाहीत असं म्हटलं आहे. मंगळवारी रात्री एनएम जोशी पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे.