मुंबई : कोरोनाविरोधातील लढा आणखी बळकट होत आहेत. प्रत्येक स्तरातील घटक कोरोनाविरोधातील लढयात सहभागी होत आहेत. हेतू एकच की कोरोनाची साखळी तुटली पाहिजे. परिणामी मुंंबईकरांना घरात बसण्याचे आवाहन सरकार आणि स्वयंसेवी संस्था करत असून, आता या कोरोनाविरोधातील लढयात मुंबई पुण्यातील बाइक रायडर्सदेखील सहभागी झाले आहेत. आणि त्यांनी नागरिकांनी ‘स्टे होम, स्टे सेफ’ असे आवाहन केले आहे.थम्पिंग रायडर्स नावाचा ग्रुप कोरोनाविरोधात लढत आहे. मुंबई आणि पुण्याचे रायडर्स यामध्ये आहेत. किमान १ हजार ६०० लोक यात आहेत. या ग्रुपला चार वर्ष झाली आहेत. आम्ही रोड सेफ्टीसाठी मोहीमा करत असतो. विविध कारणांसाठी आम्ही रायडर्सच्या माध्यमातून जनजागृती करत असतो. गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात जेव्हा पूर आला होता; तेव्हा आम्ही मदत केली होती. सामाजिक जनजागृतीसाठी आम्ही करत असतो. वाहतूक पोलीसांना आम्ही मदत करतो. आणि त्यांच्या मोहीमेत सहभागी होत असतो, असे ग्रुप लीडर प्रशांत गोरीवले यांनी सांगितले. रेणूका नाटके, महंत मांजरेकर, जावेद चौहान, ओकांर देशपांडे, दिनेश पाष्टे, हसन सोनी, जितेंद्र भल्ला, हेमंत पाटील ही मंडळी या ग्रुपमध्ये सहभागी आहेत.सर्व मंडळींनी सांगितले की, आता आम्ही करत असलेली जनजागृती सामाजिक माध्यमांद्वारे करत आहोत. फेसबुक पेजच्या माध्यमातून कोरोनाविरोधात जनजागृती करत आहोत. व्हॉटस अॅप, ट्विटर, इन्स्टाग्रामचा यासाठी आधार घेत आहोत. आता आम्ही वांद्रे येथील गरजू कुटूंबांना मदत केली. यामध्ये तांदूळ, बिस्किट, पोहे आदी वितरण केले होते. आमचा हेतू एकच की लोकांनी बाहेर पडू नये. कोरोनाविरोधात प्रत्येक जण लढा देत आहे. आम्हीही आमचा खारीचा वाटा म्हणून काम करत आहोत. सर्वांनी यात सहभागी व्हावे आणि कोरोनाला समूळ नष्ट करावे.
---------------------------
- कोरोनाला रोखण्यासाठी गिर्यारोहकांनीदेखील खारीचा वाटा उचलला आहे. गिर्यारोहक आता आपल्या माध्यमातून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करत असून, यास नागरिकांनी अधिकाधिक हातभार लावावा, असे आवाहन गिर्यारोहकांनी केले आहे.
- अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे सचिव राजन बागवे यांच्याकडील माहितीनुसार, एनसीसी, एनएसएस, क्रीडा संस्था, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून तरुणांची एक मोठी फळी तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक व इतर शहरातील अनेक गिरिमित्र आणि दुर्गमित्र यांनी अशा मदत कार्यात भाग घेऊन खारीचा वाटा उचलला आहे. पुण्यात गिरिप्रेमी संस्थेच्या वतीने मदतकार्य सुरू केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- महासंघाच्या जिल्हा पातळीवरील कार्यकारिणी व समिती या आपत्कालीन काळामध्ये सर्वोत्तपरी मदत करण्यास तयार आहेत. महासंघाच्या या डिझास्टर मॅनेजमेंट टास्क फोर्सच्या माध्यमातून महासंघाने जिल्हापातळीवर अतिशय प्रशिक्षित व अनुभवी स्वयंसेवकांची फळी सुसज्ज करण्याचे काम हाती घेतले आहे.