मुंबई : शो-शायनिंगसाठी दुचाकीमध्ये फेरबदल करून कानठाळ्या बसविणारे सायलेन्सर लावणाऱ्या चालकांना वाहतूक पाेलिसांचा ‘फटका’ बसला आहे. गेल्या वर्षभरात १ हजार ६९९ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व चालक सायलेन्सरमध्ये बदल करून ध्वनीप्रदूषण करत होते. या कारवाईत जप्त करण्यात आलेले शेकडो सायलेन्सर नष्ट करण्यात आले आहेत.
मुंबईतील रस्त्यांवर अनेकदा मोठ्याने आवाज करत सुसाट जाणाऱ्या दुचाकी दिसतात. हे दुचाकीचालक नागरिकांना व वाहतुकीला अडथळा करत असल्याने यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी दिले आहेत.
कंपनीद्वारे दुचाकीला असलेले सायलेन्सर काढून मॉडीफाय केलेले, कानठळ्या बसविणारे सायलेन्सर आढळून आल्यास २ हजार रुपये दंड ठोठावला जातो. तसेच ते सायलेन्सर जप्त करण्यात आले. कारवाईचा पुढचा टप्पा म्हणजे हे सायलेन्सर नष्ट करण्यात येतात.
दोन हजारांचा दंड :
मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनेही उपाययोजना करण्यास ७ नोव्हेंबर २०२३पासून सुरुवात केली आहे.
वाहतूक पोलिसांनी पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांविरोधात ७ नोव्हेंबरपासून कारवाईला सुरुवात केली आहे.
७ ते ९ नोव्हेंबरदरम्यान वाहतूक पोलिसांनी ८,४४५ चालकांवर कारवाई केली.
त्यात पीयूसी प्रमाणपत्र नसल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी ५,८६६ कारवाया केल्या आहेत.
राडारोडा अथवा मालाची धोकादायक वाहतूक केल्याप्रकरणी १,७३८ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
या संपूर्ण मोहिमेंतर्गत १३ लाख ७५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
५८४ सायलेन्सर जप्त - यावेळी ५८४ सायलेन्सर वाहतूक पोलिसांनी जप्त केले. त्यांच्यावर बुलडोझर चालवण्यात आले आहेत.