CoronaVirus: 'त्यानं जबरदस्तीनं मास्क काढलं अन् माझ्या तोंडावर थुंकला'; तरुणीनं सांगितली व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 10:12 AM2020-04-07T10:12:00+5:302020-04-07T10:17:29+5:30
Coronavirus पोलीस आयुक्तांकडून घटनेची दखल; कारवाईचे आदेश
मुंबई: दुचाकीस्वार तरुण एका मणिपुरी तरुणीवर थुंकल्याची धक्कादायक घटना सांताक्रुझमधील कलिना परिसरात घडली आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घटना समोर आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते.
आम्ही तरुणीचा जबाब नोंदवत असून त्यानंतर लगेचच तिच्यावर थुंकणाऱ्या तरुणाविरोधात कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास आव्हाड यांनी दिली. शोन्यो कबाई असं संबंधित तरुणीचं नाव असून ती तिच्या बहिणीसोबत अन्नधान्य खरेदी करण्यासाठी बाहेर पडली होती. त्यावेळी एक दुचाकीस्वार त्यांच्या जवळ आला. त्यानं जबरदस्तीनं तिचा मास्क काढला आणि तो तिच्यावर थुंकला. कलिना सिग्नलजवळ हा प्रकार घडला.
रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्यानं बहिणींना कोणाचीही मदत घेता आली नाही. 'मी मास्क आणि टोपी घातली होती. त्यामुळे त्या दुचाकीस्वाराला नेमका कोणत्या गोष्टीचा इतका राग आला याची मला कल्पना नाही,' असं कबाई यांनी म्हटलं. या घटनेचा कोरोनाशी काही संबंध आहे की नाही, हे मला माहीत नाही. मात्र आमच्या समुदायाला सापत्नपणाची वागणूक मिळते, अशी व्यथा कबाई यांनी मांडली
दिल्लीत वास्तव्यास असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या लिंडा नेवमाई यांनी ट्विटमधून या घटनेची माहिती दिली. 'मणीपूरची एक तरुणी नवी पीडिता ठरली आहे. तासाभरापूर्वी हा प्रकार घडला. एक दुचाकीस्वार तिच्यावर थुंकला. अशा प्रकारचा वंशभेद थांबायला हवा. आपण कोरोनाचा सामना करायचा की वंशवादाचा? या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्वरित कारवाई करावी, अशी मी विनंती करते,' असं नेवमाईंनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.