Join us  

वीजबिलांची करणार होळी !

By admin | Published: February 04, 2015 2:42 AM

राज्यातील वीजदरवाढ तत्काळ मागे घेतली नाही, तर २७ फेब्रुवारीला वीजबिलांची होळी करण्याचा इशारा वीजग्राहक संघटनेने मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

मुंबई : राज्यातील वीजदरवाढ तत्काळ मागे घेतली नाही, तर २७ फेब्रुवारीला वीजबिलांची होळी करण्याचा इशारा वीजग्राहक संघटनेने मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. वीजग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित वीजग्राहक संघटना, औद्योगिक, यंत्रमागधारक व शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत हा निर्णय घेण्यात आला आहे.यावेळी समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे म्हणाले, शेजारील राज्यांच्या तुलनेत राज्यातील औद्योगिक वीज दर हा दीडपटावर गेला आहे. परिणामी परराज्याच्या तुलनेत येथील उद्योग स्पर्धेत टीकाव धरू शकत नाहीत. त्यात वस्त्रोद्योगात असलेल्या मंदीमुळे यंत्रमागधारक आधीच तोट्यात आहेत. त्यामुळे दरवाढ तत्काळ मागे घेतली नाही, तर उद्योग बंद किंवा स्थलांतरित होण्याची भीती आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व प्रकरणाची सरकारला जाणीव आहे. कारण हिवाळी अधिवेशनापूर्वी जानेवारी २०१५ पर्यंत अनुदान सुरू ठेवून रास्त दर निर्धारित करण्याचे आश्वासन सरकारने संघटनेला दिले होते. मात्र केवळ नोव्हेंबर महिन्याचे अनुदान दिल्यानंतर सरकारने अनुदान देणे बंद केले आहे. शिवाय रास्त दर ठरवण्यासाठी कोणतीही बैठक बोलावलेली नाही. त्यामुळे संघटनेसमोर आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही.समन्वय समितीने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने १ डिसेंबर २०१४ पासून दरमहाचे अनुदान बंद केल्याने राज्यातील सर्व औद्योगिक व घरगुती ग्राहकांच्या वीजबिलात २० ते २२ टक्के वाढ झाली आहे. तर यंत्रमागधारकांच्या बाबतीत २७ हॉर्सपॉवरआतील ग्राहकांच्या वीज बिलात २४ टक्के आणि २७ हॉर्सपॉवरवरील ग्राहकांच्या वीज बिलात ४८ टक्के वाढ झालेली आहे. शिवाय आणखी १२ टक्के म्हणजे ५ हजार ९०५ कोटी रूपयांची दरवाढीची याचिका महावितरणने आयोगासमोर दाखल केल्याचा दावा समन्वय समितीने केला आहे.२० फेब्रुवारीपर्यंत जनजागरण : दरवाढ मागे घेण्यासाठी संघटना जनजागृती करून आंदोलन उभारणार आहे. त्यासाठी संघटनेतर्फे महावितरण कार्यालये, शासकीय कार्यालये, बिल्डींग सेंटर्स याठिकाणी होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स, फलक लावून जागरण केला जाईल. स्थानिक आमदार, खासदार व मंत्री यांना भेटून संघटनेचे प्रतिनिधी बैठक आयोजित करण्यास प्रवृत्त करतील. प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेऊन दरवाढीमुळे निर्माण प्रश्नांची जाणीव करून दिली जाईल.़़़नाहीतर वीजबिलांची होळी : २० फेब्रुवारीपर्यंत शासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही, तर २७ फेब्रुवारीला प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय व महावितरण कार्यालयावर मोर्चे काढण्यात येतील. यावेळी प्रमुख चौकात वीज बिलांची होळी करण्यात येईल. त्यात उद्योजक, यंत्रमागधारक व घरगुती ग्राहकांचा समावेश असेल.नाहीतर ५ लाख निवेदने राज्य सरकारने तत्काळ उपाययोजना करून रास्त दर निर्धारित करण्यासाठी बैठक बोलावण्याची मागणी संघटनेने केली आहे. नाहीतर येत्या महिन्याभरात ५ लाख सामान्य वीजग्राहक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र, ई-मेल आणि एमएमएस करून वीज दरवाढ मागे घेण्याचे आवाहन करतील.