स्वस्त घरांच्या आमिषाने दहावी नापास वृद्धाने उभारले कोट्यवधींचे साम्राज्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 01:35 AM2018-02-10T01:35:21+5:302018-02-10T01:35:30+5:30

दहावी नापास, त्यात बेरोजगार. पैसे कमाविण्यासाठी त्याने काही जणांना एकत्र घेऊन संस्था स्थापन केली. ३ लाखांपासून ते १८ लाखांपर्यंत १ बीएचके, २ बीएचके, ३ बीएचकेच्या स्वस्त घरांच्या आॅफर तो संस्थेच्या माध्यमातून दैनिकांमध्ये जाहिरातींद्वारे देऊ लागला.

Billionaire empire created by the 10th anniversary of the low house of lover of cheap houses! | स्वस्त घरांच्या आमिषाने दहावी नापास वृद्धाने उभारले कोट्यवधींचे साम्राज्य!

स्वस्त घरांच्या आमिषाने दहावी नापास वृद्धाने उभारले कोट्यवधींचे साम्राज्य!

Next

- मनीषा म्हात्रे

मुंबई : दहावी नापास, त्यात बेरोजगार. पैसे कमाविण्यासाठी त्याने काही जणांना एकत्र घेऊन संस्था स्थापन केली. ३ लाखांपासून ते १८ लाखांपर्यंत १ बीएचके, २ बीएचके, ३ बीएचकेच्या स्वस्त घरांच्या आॅफर तो संस्थेच्या माध्यमातून दैनिकांमध्ये जाहिरातींद्वारे देऊ लागला. अनेक जण याला फसले. काही पोलिसांनीही घरासाठी पैसे गुंतविले. हळूहळू धंदा वाढल्याने, तो चाळीतून थेट दादरच्या उच्चभ्रू वसाहतीत राहायला गेला. आलिशान गाडी, सोबतीला बॉडीगार्ड घेऊन फिरू लागला. तब्बल ७ वर्षे त्याचा हा फसवणुकीचा धंदा सुरू होता. या ७ वर्षांत त्याने जवळपास सहा हजारांहून अधिक नागरिकांना फसवून कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले. मधुकर विठ्ठल सूर्यवंशी (६०) असे या प्रतापी वृद्धाचे नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो फरार होता. अखेर तपासाअंती या महाठगाला औरंगाबाद पोलिसांनी नुकत्याच बेड्या ठोकल्या. मुंबई पोलिसांचे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक या ठगाचा ताबा घेण्यासाठी औरंगाबादला रवाना झाले आहे.
मूळचा लातूरचा रहिवासी असलेला सूर्यवंशी मालाडच्या दामूनगर झोपडपट्टीमध्ये पत्नी आणि मुलासोबत राहायचा. दहावी नापास असल्याने, त्याला कुठेही नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे त्याने शक्कल लढवत, तेथील काही जणांना सोबत घेतले. ‘सम्यक निवास हक्क संघ प्रायोजक भीम फाउंडेशन’ या नावाने २००७ मध्ये त्याने संस्था स्थापन केली. संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना स्वस्त घरासाठी पैसे गुंतवायला लावायचे, त्या पैशांतून जमिनी खरेदी करून त्यांना स्वस्तात घरे द्यायची, असे त्याने ठरविले होते. त्याच्या सोबतीला मिलिंद सीताराम कासारे (४८), विकासक प्रमोद पाल, तसेच संस्थेचे अन्य सभासद होते. दैनिक आणि साप्ताहिकामध्ये त्याने गुंतवणुकीसंदर्भात जाहिराती दिल्या. त्याला भुलून नागरिकांनी त्याच्याकडे पैसे गुंतविण्यास सुरुवात केली. मुंबईतील मालाड मार्वे, वडाळ्यासह, नाशिक, औरंगाबादससारख्या १७ हून अधिक जिल्ह्यांतील नागरिकांना त्याने फसविले. ठरावीक ठिकाणी विकत घेतलेल्या जागा तो नागरिकांना दाखवायचा. २०१४ मध्ये या ठिकाणी हक्काचे घर मिळवून देण्याचे आमिष त्याने अनेकांना दाखविले होते.
मुंबईत २ ते ३ हजारांहून अधिक जणांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली. गेल्या ७ वर्षांत त्याने सहा हजारांहून अधिक नागरिकांना फसवून कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले.
औरंगाबादमधील काही पोलीसही त्याच्या आमिषाला बळी पडले. या पैशांतून त्याने दादर परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत घर घेतले. पत्नीच्या निधनानंतर तो मुलासोबत राहू लागला. आलिशान गाडी, स्वत:च्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड असा त्याचा रुबाब होता. मात्र, २०१४ मध्ये घर देण्याचे ठरले असताना, टॉवर उभारणारी जागा ओसाडच दिसल्याने नागरिकांना संशय आला. त्यांनी त्याच्याकडे पैसे परत करण्याचा तगादा लावला. २०१४ च्या अखेरला तो पळून गेला. सेवानिवृत्त पोलीस जमादार राम पुंडलिक यांनी यामध्ये १ लाख २० हजार रुपये गुंतविले होते. त्यांचीही फसवणूक झाल्याने, २०१५ मध्ये त्यांनी औरंगाबादमधील सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि त्याच्याविरुद्ध पहिला गुन्हा दाखला झाला.
त्यानंतर, मुंबईतील भोईवाडासह, औरंगाबाद, नाशिक, पुणे अशा विविध शहरांमध्ये सूर्यवंशीसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच झाले. भोईवाड्यात त्याच्यावर ३ कोटींहून अधिक रकमेचा गुन्हा दाखल झाल्याने, हा गुन्हा पुढे तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

औरंगाबादच्या पीएसआयने ठोकल्या बेड्या
एमआयडीसी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर, या गुन्ह्याचा तपास पीएसआय विश्वनाथ झुंजारे यांच्याकडे आला. त्यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, सखोल तपास सुरू केला. त्यानंतर सर्वात प्रथम औरंगाबाद गुन्हे शाखेन विकासक प्रमोद पाल याला अटक केली. त्याच्या पाठोपाठ एमआयडीसी पोलिसांनी मधुकर सूर्यवंशीला तपासाअंती बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीत वरील घटनेला वाचा फुटली. औरंगाबाद, नाशिकमध्ये तर त्याने उल्लेख केलेल्या ७ जागा दुसºयाच व्यक्तीच्या नावावर असल्याचे समोर आले. लवकरच त्याचा ताबा मुंबई गुन्हे शाखा घेणार असल्याचे झुंजारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

संस्थेचे चिमुरडेही सदस्य
या संस्थेमध्ये सूर्यवंशी व कासारेने त्याच्या लहान मुलांनाही सदस्य केले आहे.

वेषांतर करून नाशिकमध्ये : सूर्यवंशीसह या मास्टरमाइंड असलेला मिलिंद कासारे सध्या वेषांतर करून नाशिकमध्ये लपून बसल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांना आहे. त्याच्या मागावर पोलीस आहेत. त्यालाही लवकरच अटक होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबईत दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पथक अधिक तपास करणार आहेत. त्याने मुंबईत आणखी किती जणांना गंडा घातला, या प्रकरणाचा सखोल तपास करून, त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात येणार आहे.

Web Title: Billionaire empire created by the 10th anniversary of the low house of lover of cheap houses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा