मनीषा म्हात्रेमुंबई : माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत मित्राने गुंगीचे औषध देत मुंबईच्या अब्जाधीशाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवले. पुढे, याच व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करत पैसे उकळण्यास सुरुवात केली. भोपाळ ते मुंबई दरम्यान तीन कोटी उकळून झाल्यानंतर, मुंबईत कार अडवून फायनल सेटलमेंटच्या नावाखाली आणखीन दोन कोटींची मागणी करताच महिलेने पोलिसांत धाव घेतली. अखेर, एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीसह मोनिका मिश्राविरोधात खंडणीचा गुन्हा नोंदवला.
मूळची भोपाळची असलेली ३८ वर्षीय महिला जोगेश्वरीतील बड्या इमारतीत राहण्यास आहे. त्यांचे पती हजारो कोटींची उलाढाल असलेल्या एका बड्या रिफायनरी समूहाचे प्रमुख आहेत. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, २०२१ मध्ये कामानिमित्त भोपाळ येथे गेले असताना धर्मेंद्र मिश्रासोबत ओळख झाली. मिश्राचे पत्नी मोनिका सोबत घरी येणे-जाणे सुरू झाले. यातूनच धर्मेंद्रने प्रेमासाठी गळ घातली. महिलेने नकार दिला. मात्र, माफी मागून संवाद पुन्हा कायम ठेवण्याच्या नावाखाली जवळीक साधली. २५ एप्रिल रोजी त्याने, ज्यूसमधून गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याचे नमूद केले. याबाबत तक्रार दिल्यास मुलांचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तक्रार केली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मे २०२१ मध्ये तक्रारदार महिला मुंबईला परतल्यानंतर मिश्राने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मोनिका मिश्राचे वडील आणि भाऊ हेही धमकी देऊन पैसे वसूल करत होते. स्वतःसह पतीची प्रतिष्ठा जपण्यासाठी महिलेने तक्रार केली नाही. गेल्या वर्षापर्यंत तीन कोटी उकळण्यात आले. तसेच तिच्या भीतीचा फायदा घेत वेळोवेळी मुंबई, भोपाळ येथे अत्याचार केले. अनेकदा मारहाणही केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
भोपाळमध्येही बॅट व हॉकी स्टिकने हल्ला गेल्या वर्षी ३ नोव्हेंबर रोजी चौकडीने बॅट व हॉकी स्टिकने मारहाण केली. याबाबत भोपाळ येथील टीटीनगर पोलिस ठाण्यात पीडितेने तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. घडलेला प्रकार पतीला सांगून, खंडणीबाबत पोलिसांत तक्रार दिली. पुढे, भोपाळ पोलिसांनी खंडणीचा दुसरा गुन्हा चौकडीविरोधात नोंदवला आहे.
त्या दिवशी नेमके काय घडले?२५ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ते पवई येथील मॉलमध्ये जात असताना, जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड येथे एका अज्ञात दुचाकीस्वार गाडीसमोर आला. मोनिका मिश्राने पाठविले असून, त्याने दहा लाखांची मागणी केली. दोन कोटींमध्ये फायनल सेटलमेंट करण्यास सांगितले. संबंधित पीडितेने याबाबत २८ फेब्रुवारीला मेघवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तेथून हे प्रकरण एमआयडीसी पोलिसांकडे आले.
तपास सुरूयाप्रकरणी गुन्हा दाखल असून, अधिक तपास सुरू असल्याचे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले.