बोरिवलीतील विस्तारित पुलाच्या कामात कोट्यवधी रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:09 AM2021-08-28T04:09:57+5:302021-08-28T04:09:57+5:30
मुंबई - बोरिवली येथील कोरा केंद्र उड्डाणपुलाच्या विस्तारीकरण प्रकल्पात वाढीव कामांसाठी निविदा प्रक्रिया न राबविता मूळ ठेकेदाराला ३६० कोटी ...
मुंबई - बोरिवली येथील कोरा केंद्र उड्डाणपुलाच्या विस्तारीकरण प्रकल्पात वाढीव कामांसाठी निविदा प्रक्रिया न राबविता मूळ ठेकेदाराला ३६० कोटी ३७ लाख रुपयांचे वाढीव कंत्राट पालिका देणार आहे. वाढीव कामाचे कंत्राट त्याच ठेकेदाराला दिल्यामुळे ६३ कोटी रुपयांची बचत होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
बोरिवली पश्चिम, कोरा केंद्र येथील एस. व्ही. रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी रेल्वे मार्गापासून कल्पना चावला चौकापर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलाचे बांधकाम नोव्हेंबर २०१८ मध्ये सुरू करून दोन वर्षांमध्ये पूर्ण करण्याची अट निविदेत घालण्यात आली. त्यानुसार या प्रकल्पासाठी १२१ कोटी ७३ लाख रुपये खर्च अंदाजण्यात आला होता.
मात्र सात टक्के कमी दराने काम करण्याची तयारी ठेकेदाराने दर्शविल्याने त्याला ११३ कोटी १६ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले. परंतु, पुलाच्या कामात वाढ झाल्याने ३६० कोटी ३७ लाख रुपये अतिरिक्त खर्च येणार आहे. हे वाढीव कामही त्याच ठेकेदाराला देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
यासाठी त्याचा ठेकेदाराला कंत्राट
एकाच पुलाच्या कामासाठी दोन निविदा प्रक्रियेमुळे खर्चात वाढ होऊ शकते. त्यामुळे या पुलाचे विस्तारीकरण करणाऱ्या ठेकेदारालाच वाढीव काम देण्यात येणार आहे. यामुळे ६३ कोटी रुपयांची बचत होणार आहे.