Join us  

बिमल रॉय यांच्या स्मृतींना उजाळा!

By admin | Published: July 02, 2014 1:21 AM

भारतीय चित्रपट इतिहासात जे देदीप्यमान तारे चमकून गेले त्यामध्ये निर्माते-दिग्दर्शक बिमल रॉय यांचे स्थान अढळ आहे.

मुंबई : भारतीय चित्रपट इतिहासात जे देदीप्यमान तारे चमकून गेले त्यामध्ये निर्माते-दिग्दर्शक बिमल रॉय यांचे स्थान अढळ आहे. रॉय यांच्या चित्रपटांना आजमितीस अनेक वर्षे लोटली तरी त्यातील आशय, कलात्मकता आणि सर्जनशीलता सामान्य रसिकांच्या हृदयाचा ठाव अजूनही घेत असतात. बिमल रॉय यांच्या अशाच काही खास आठवणींना ‘बिमल रॉय : हिस लाइफ अ‍ॅण्ड टाइम’ या विशेष प्रदर्शनाद्वारे उलगडणार आहे.हिंदी चित्रपटांच्या इतिहासात बिमल रॉय हा वेगळाच फिनॉमिनन होऊन गेला. या विशेष प्रदर्शनातून रॉय यांच्या चित्रपटांचे पोस्टर्स, छायाचित्रे, पोशाख, गीतांच्या वह्या रसिकांना पाहायला मिळतील. शिवाय या प्रदर्शनादरम्यान चित्रपट क्षेत्राविषयी काही शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येईल. त्यात व्याख्याने, कार्यशाळा, नाट्य कार्यशाळा, संगीत मेजवानीचा समावेश असणार आहे. याप्रसंगी, रॉय यांच्या ‘बंदिनी’, ‘सुजाता’ आणि ‘मधुमती’ या चित्रपटांचे स्क्रीनिंगही होणार आहे.१९११ ते १९६६ या काळातील ‘उदयरे पथे’, ‘दो बीघा जमीन’, ‘परिणीता’, ‘बिराज बहू’, ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘सुजाता’, ‘बंदिनी’, ‘परख’ आणि ‘बापबेटी’ अशी अनेक चित्ररत्ने रॉय यांच्या श्रेष्ठत्वाची जाणीव करून देतात. यातील प्रत्येक कलाकृती वैशिष्ट्यपूर्ण असून प्रदर्शनात यांचा उलगडा करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ‘सिटीलाइट’ चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या हस्ते ७ जुलै रोजी सायंकाळी ६.४५ वाजता होणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर नसरिन मुन्नी कबिर यांचा ‘सायलंट थंडर : बिमल रॉय’ या चित्रपटाचे स्क्रीनिंग होईल. हे प्रदर्शन २० जुलैपर्यंत सर्व रसिकांसाठी खुले राहील. (प्रतिनिधी)