मुंबई : मुंबईत काँक्रिटचे जंगल उभे राहत असले तरी आजही मुंबई आणि लगतचा परिसर जैव विविधतेने नटलेला आहे. ही जैवविविधता एका तरुणाने नकाशात बंदिस्त केली असून, डिजिटल आणि वेगवेगळ्या माध्यमांतून ती नागरिकांसमोर मांडली जाणार आहे. जैविविविधतेचे महत्त्व नागरिकांना कळावे. जैवविविधतेचे संवर्धन व्हावे. तरुणांसह नव्या पिढीला आणि अभ्यास, संशोधकांना याची नकाशाद्वारे माहिती व्हावी हा या मागचा उद्देश आहे.
ग्रीन ह्यूमर या शीर्षकाखाली प्रसिद्ध असलेल्या रोहन चक्रवर्ती यांनी वन्यजीवनांचे आकर्षण, खारफुटीची जंगले, शहरी हिरवी जागा आणि ९० पेक्षा जास्त प्रजातींचे वर्णन करण्यासाठी मुंबईतील जैवविविधतेचा नकाशा तयार केला आहे. बायोडायवर्सिटी बाय द बे या मोहिमेसाठी हा अनोखा नकाशा तयार करण्यात आला आहे. मनिस्ट्री ऑफ मुंबई मॅजिक यांनी यासाठी सहकार्य केले आहे. मुळात जैवविविधतेचे संवर्धन व्हावे आणि नागरिकांना याची माहिती मिळावी हा या मागचा हेतू आहे.
मुंबईच्या जैवविविधतेच्या नकाशाबद्दल रोहन चक्रवर्ती यांनी सांगितले की, शहरातील जैवविविधतेचे दृष्य स्त्रोत असलेलया मुंबईकर तरुणांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने हे काम सुरु आहे. एक महिना झाला हे काम सुरु आहे. डिजिटल, प्रिंट आणि होर्डिंग्ज या माध्यमातून हा नकाशा समोर आणला जाईल. थोडक्यात मुंबईच्या या टोकापासून त्या टोकांपर्यंत काय जैव विविधता आहे, याची माहिती आम्ही दिली आहे. आम्ही मुंबईचा अभ्यास करत ही माहिती गोळा केली आहे. कोरोनामुळे काही अडचणी आल्या असल्या तरी देखील आम्ही त्यावर मात करत हा नकाशा तयार केला आहे.
मुंबईच्या जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी, तरूण मुंबईकरांनी एकत्र येऊन हे काम सुरु केले आहे. महापालिका आणि सरकार यांच्या मदतीने हे काम सुरु राहिल. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून मोहिमेचा समारोप केला होईल. लेझर फ्लेमिंगो आणि त्यांचे वास्तव्य यांचे महत्त्व लक्षात घेऊन संरक्षणासह पाच कलमी कृती योजना तयार होत असून, आरेला जंगल म्हणून मान्यता देणे आणि मुंबईच्या हिरव्यागार संरक्षणासाठी काम करणे हा देखील बायोडायवर्सिटी बाय द बे या मोहीमचा एक भाग आहे.