जैवविविधतेचे जतन होणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 04:40 AM2020-06-05T04:40:11+5:302020-06-05T04:40:21+5:30
मुंबईची रसायनमिश्रित पाणी, सांडपाणी, मायक्रो प्लास्टिक, शहरीकरणामुळे हानी होत आहे. प्रदूषित अंशाद्वारे प्रदूषित अन्न पोटात जात आहे आणि आजारांना ...
मुंबईची रसायनमिश्रित पाणी, सांडपाणी, मायक्रो प्लास्टिक, शहरीकरणामुळे हानी होत आहे. प्रदूषित अंशाद्वारे प्रदूषित अन्न पोटात जात आहे आणि आजारांना निमंत्रण मिळत आहे. पर्यावरणावर भार टाकल्याने प्रदूषित समुद्र, नदीचा आपल्यावर परिणाम होत आहे.
सचिन लुंगसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मी निसर्गाशी कसा निगडित आहे; माझ्या प्रत्येक कृतीचा निसर्गावर काय परिणाम होणार आहे? याचा विचार केला तर आपण शाश्वत समाज निर्माण करू शकू.
पाणी, हवा आणि जैवविविधतेचा समतोल राखत आयुष्य जगलो तर पर्यावरण बदलांना रोखू शकू. परिणामी वातावरण बदल गांभीर्याने घेण्याची गरज असून, अन्न, वस्त्र, निवारा यासाठी पर्यावरणपूरक राहता येईल; आणि निसर्गाचा समतोल राखत आपण पुढे गेले पाहिजे, असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने संकटांकडे लक्ष वेधण्यात आले असून पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे, असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी मांडले आहे.
समुद्राच्या पाण्याची वाढती पातळी धोकादायक असून, वाढत्या पातळीमुळे २०५०पर्यंत म्हणजे ३१ वर्षांत अर्धी मुंबई पाण्याखाली जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. न्यू जर्सी येथील वैज्ञानिक संघटना असलेल्या ‘क्लायमेट सेंट्रल’च्या ‘नेचर कम्युनिकेशन’ या पत्रकात असे नमूद करण्यात आले. २०५० पर्यंत यामुळे जगभरातील तब्बल १५ कोटी लोक बाधित होतील. काही वर्षांनंतर सुमारे १५ कोटी लोकांकडे राहण्याचीही व्यवस्था नसेल. चीन, बांगलादेश, भारत, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि थायलंड या देशांना समुद्राच्या वाढत्या पाण्याच्या पातळीचा फटका बसणार आहे. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाही, अशी अवस्था आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात जगभरात ठिकठिकाणी नोंदविण्यात आलेल्या कमाल तापमानामुळे हा महिना पृथ्वीवरील सर्वाधिक उष्ण ठरला. १९ जुलै रोजी सांताक्रुझ वेधशाळेत कमाल तापमान ३६.२ नोंदविण्यात आले. सर्वसाधारण कमाल तापमानाच्या तुलनेत हे कमाल तापमान ६ अंशाने अधिक होते. जुलै महिन्यातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक कमाल तापमान होते. २२ जुलै १९६० रोजी ३४.८ एवढ्या तापमानाची नोंद झाली.
पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी...
1. नागरिकांनी आपले दैनंदिन कर्बउत्सर्जन कमी करावे. त्यासाठी कर्बपदचिन्हे, जलपदचिन्हे, पर्यावरणीय पदचिन्हे समजून घेऊन कमीत कमी करून जगावे.
2. आपले अन्न शक्यतो स्थानिक पातळीवरील विकत घ्यावे.
3. वस्तू खरेदी करताना त्याचा छुपा वा प्रत्यक्ष पर्यावरणावर
काय परिणाम होणार आहे, त्याचा विचार करावा आणि ती वस्तू घ्यायची की नाही, ते ठरवावे.
4. पर्यावरणावर आणि कर्बउत्सर्जन कमी करण्यासाठी जागरूकपणे व्यक्त व्हा.
5. पाणी किती अंतरावरून येते ते पाहावे. लांबून येत असेल, तर कर्बउत्सर्जन वाढते. पाण्याचा पुनर्वापर करणाऱ्यांना सवलत द्यावी आणि जे करीत नाहीत त्यांना शिक्षा व्हावी.
6. निसर्ग आॅक्सिजन देतो. आपण निसर्गाला काय परत देतो, याचा विचार करा. भावी पिढीला आॅक्सिजन मुबलक मिळावा म्हणून झाडे लावा.
7. शेतकरी, आदिवासी हे झाडांचे रक्षण करतात. त्यांना सरकारने अनुदान द्यावे. मग लोक झाडे जपतील.
8. कोणताही प्रकल्प आणताना त्याचा तात्काळ होणारा फायदा न पाहता भविष्यातील आपत्तीवर विचार व्हावा.
9. बायोडिझाईन तयार करून इमारती उभ्या राहिल्या, तर निसर्ग आपत्ती आणणार नाही.
10. शहरे हरित करण्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे.