जैवविविधतेचे नंदनवन : कोकणातील ८ ठिकाणी ‘रॉकी टाइड पूल’, निसर्ग-पर्यटनाची संधी
By सचिन लुंगसे | Published: September 23, 2022 01:07 PM2022-09-23T13:07:40+5:302022-09-23T13:14:25+5:30
महाराष्ट्रातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये किनारपट्टीच्या भागातील टाइड पूल (खडकाळ खळगे) परिसरात ३०३ प्रजाती असल्याचे संशोधनातून समोर आले.
मुंबई : कोकण किनारपट्टीच्या भागात वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींचे जग उलगडले असून आणि महाराष्ट्राला निसर्ग पर्यटनाची विपुल संधी प्राप्त झाली आहे. राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांबळडेग, कुणकेश्वर आणि भोगवे या तीन ठिकाणी तर रत्नागिरी जिल्ह्यातील काटघर, हेदवी, खारवीवाडा, वेळास आणि वेळणेश्वर या पाच ठिकाणी कोस्टल टाइड पूल टुरिझम विकसित करण्याची संधी आहे. या माध्यमातून स्थानिकांना उपजीविकेचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
या खडकाळ समुद्रकिनाऱ्यावरील इंटरटायडल (भरतीच्या वेळी हा भाग पाण्याखाली जातो आणि ओहोटीच्या वेळी पाण्याच्या वर असतो) झोनमध्ये विस्मयकारक रचना पाहायला मिळतात. यात इंटरटायडल रॉक पूल्सचा (याला टाइड पूल असेही म्हणतात) समावेश आहे. हे रॉकी टाईड पूल अनेक समुद्री जीवांसाठी लघुअधिवास असतात. इतर इंटरटायडल किनाऱ्यांच्या तुलनेने खडकाळ किनाऱ्यांवर सूक्ष्मजीवांची घनता सर्वाधिक असते आणि प्राणी व वनस्पतीच्या प्रजातींची उत्तम जैवविविधता या ठिकाणी आढळते. अनेक समुद्री जीव खडकाळ खळग्यांमध्ये तात्पुरता आसरा घेतात, अन्नाचा स्रोत म्हणून यांचा वापर करतात आणि काही प्रजातींसाठी ही जागा त्यांच्या पिल्लांसाठी उत्तम पोषण निवारा असते.
मॅनग्रोव्ह अँड मरिन बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेने सलिम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी अँड नॅचरल हिस्टरी (सॅकॉन) या संस्थेस स्मॉल ग्रँट्स प्रोग्रामअंतर्गत या अभ्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. महाराष्ट्रातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीच्या भागातील रॉकी टाईड पूलच्या परिसंस्थेतील प्राणीसृष्टीचे दस्तावेजीकरण या अभ्यास प्रकल्पाचे नेतृत्व गोल्डिन क्वाड्रोस, शिरीष मांची आणि सिद्धेश भावे यांनी केली आहे. त्यांना या रॉकी टाईड पूलमध्ये (खडकाळ खळगे) ३०३ समुद्री जीव आढळले. यात समुद्रशैवाल आणि अल्गी यांच्या ३० प्रजाती, वनस्पतीप्लवकाच्या ८० प्रजाती, प्राणिप्लवकाच्या ७३ प्रजाती, डोळ्यांना दिसणारे प्राणी, दोन्ही पृष्ठवंशीय (सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, मासे) व अपृष्ठवंशीय (कवचधारी, एकिनोडर्म, अॅनेलिड्स, अॅम्फिपॉड इत्यादी) यांत ८० प्रजाती, तसेच पक्ष्यांच्या ३० प्रजाती या २८८ किमी क्षेत्रफळावर पसरलेल्या कोकणातील किनारपट्टीवर केलेल्या अभ्यासात आढळून आल्या.
“रॉकी टाईड पूलमधील परिसंस्था महत्त्वाची आहे कारण या ठिकाणी व्यापक जैवविविधेसाठी अनुकूल परिस्थिती असते. अनेकविध प्रजातींच्या पिल्लांसाठी पोषणअधिवास म्हणून हे खळगे उपयुक्त असतात. त्याचप्रमाणे लवकरच ते अन्नसुरक्षाही प्रदान करतील. ही परिसंस्था, त्यांची वैविध्यता, कार्ये व मूल्ये याची माहिती किनारपट्टी भागातील तरुणांना समजली तर त्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होईल”, असे सॅकॉनमधील प्रमुख शास्त्र व या अभ्यासाचे लेखक गोल्डिन क्वाड्रोस म्हणाले.
खडकाळ खळग्यांची व्यवस्थित यादी करणे आणि या भागातील जैवविविधता निश्चित करणे हे या अभ्यासाचे उद्दीष्ट आहे. या घटकांमुळे या भागात पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे, असे कांदळवन कक्षाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक आणि मॅनग्रोव्ह फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक वीरेंद्र तिवारी यांनी नमूद केले. “जैवविविधतेचे मूल्यमापन करण्याच्या विचारातून या अभ्यासप्रकल्पाचा विचार करण्यात आला असला तरी या अभ्यासातून मिळणाऱ्या निष्कर्षांमुळे निसर्गपर्यटनाच्या संधींचा उदय होऊ शकतो. वातावरण बदलाचे परिणाम अपरिहार्य असताना, या सगळ्याचा समुद्रातील जैवविविधतेचे नुकसान कमी होण्यासाठी उपयोग होऊ शकतो, समुद्रातील काही भाग स्वच्छ करण्यासाठी जीव-उपचारात्मक उपयोग होऊ शकतो आणि स्थानिक मच्छिमारांना उत्पन्नाचा नवा पर्याय मिळेल”, असे ते म्हणाले.
तिवारी पुढे म्हणाले की, इतर देशांच्या तुलनेने भारतात खडकाळ खळग्यांचा तुलनेने कमी अभ्यास झाला आहे. या भागातील निसर्गपर्यटनाचा भाग म्हणून कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान टाइड-पुलिंग उपक्रम सुरू करण्याची योजना आखत आहेत.
ओहोटीच्या वेळी किनारपट्टीच्या भागात हा उपक्रम राबवून या माध्यमातून खडकाळ इंटरटायटल झोन्ससारखी यापूर्वी न पाहीला गेलेला जैवविविधतेचा भाग व परिसंस्था पाहता येऊ शकते. “स्थानिक समुदायाला समाविष्ट करून या आठ ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यासाठीच्या व्यवहार्यतेचे मूल्यमापन आम्ही करत आहोत. आणि या अभ्यासाच्या आधारे पुढील योजना आखण्यात येणार आहे”, असे ते म्हणाले.
संशोधकांनी किनारपट्टीच्या भागातील ४५ खडकाळ भागांचे सर्वेक्षण केले आणि या अभ्यासासाठी त्यांनी ५०० मीटरचा सलग खडकाळ किनारा असलेल्या २५ ठिकाणांची निवड केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा रत्नागिरी जिल्ह्यात अधिक संख्येने इंटरटायडल भाग आढळून आले. मान्सूनपूर्व, मान्सून आणि मान्सूनपश्चात अशा तीन काळात हे सर्वेक्षण करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खडकाळ खळग्यांमध्ये अधिक विपुल प्रमाणात प्रजातींची विविधता आढळून आली. कुणकेश्वरमध्ये सर्वाधिक तर गिर्ये घारी खळग्यांमध्ये सर्वात कमी विविधता अभ्यासात आढळली. रत्नागिरी जिल्ह्यात प्रजातींचे सर्वाधिक जैविध्य वेळासमध्ये (कासव महोत्सवासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण) आढळून आली तर किमान विविधता गावखाडी खडकाळ खळग्यांमध्ये दिसून आली.