रुग्णालयांतील ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस; प्रकल्पासाठी सुमारे ९ कोटी रुपये खर्च अपेक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 10:15 AM2024-02-16T10:15:30+5:302024-02-16T10:17:31+5:30
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांतील कँटीनमध्ये निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यांपासून बायोगॅसची निर्मिती केली जाणार आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांतील कँटीनमध्ये निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यांपासून बायोगॅसची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी या रुग्णालयांमध्ये बायोमिथेनेशन प्लांट उभारले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे ९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
केईएम, सायन, नायर, राजावाडी आणि ग्रुप ऑफ वडाळा क्षयरोग रुग्णालयांतील कॅन्टीनमध्ये हे प्लँट उभारले जाणार आहेत. रुग्णालयांच्या कँटीनमध्ये रोज टाकाऊ अन्नपदार्थ, भाजीपाला व अन्य प्रकारचा हजारो किलो ओला कचरा निर्माण होतो. हा कचरा थेट डम्पिंग ग्राऊंडवर जातो. या कचऱ्यावर रुग्णालयांच्या आवारातच प्रक्रिया करून त्यापासून बायोगॅस निर्माण करण्यात येणार आहे. प्रत्येक रुग्णालयात दोन मेट्रिक टन क्षमतेचा बायोमेथेनेशन प्लांट उभारला जाणार आहे.
रुग्णालयातील ओल्या कचऱ्याचे बायोगॅसमध्ये रूपांतर केले जाईल व त्याचा वापर रुग्णालयाच्या कॅन्टीनसाठीच केला जाईल. पालिकेने या प्रकल्पासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेत एकूण चार कंत्राटदारांनी भाग घेतला होता.
या प्रकल्पामुळे रुग्णालये शून्य कचरा होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे येतील. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास येत्या काळात या प्रकल्पातून कचऱ्यातून वीजनिर्मितीचा विचार पालिका करते आहे.
यामधून दररोज १७० युनिट वीज निर्माण होण्याचा अंदाज आहे. ही वीज रुग्णालयांच्या आवारातील पदपथ व इतर लहान कामांसाठी वापरता येऊ शकते.